Saturday, December 7, 2013

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

३२) फोरास रोड (आर एस निमकर मार्ग) - हे नाव कोठल्याहि साहेबाचे नसून मुंबई बेटे पोर्तुगीज अमलाखाली असण्याच्या दिवसांत ह्या शब्दाचा उगम आहे.  तेव्हा ही बेटे वसईकर पोर्तुगीज अमलाचा भाग होती. बेटावरील जमीन ज्या धारकांकडे होती त्यांचे जमिनीवरचे हक्क कशा प्रकारचे होते ह्या विषयाशी ह्या नावाचा संदर्भ आहे आणि त्याचे दोन परस्परविरोधी अर्थ लागू शकतात असे दिसते.  अशा जमिनीस पोर्तुगीज शासक ’फोरा’ जमीन असे म्हणत असत.  हा पोर्तुगीज ’फोरा’ शब्द कसा निर्माण झाला ह्याविषयी दा कुन्हा ह्यांनी विस्तृत वर्णन केले आहे परंतु त्यांच्या पुस्तकाचे जालावरील उपलब्ध पान संपूर्णपणे अवाचनीय आहे. मायकेल वेस्ट्रॉप ह्या न्यायाधीशांच्या निर्णयात ह्याच शब्दाचा वेगळा अर्थ लावला आहे.  त्या सर्व वादात
अधिक न शिरता असे म्हणता येईल की १८४० नंतर वाढत्या मुंबईत किल्ल्याच्या उत्तरेस सार्वजनिक सोयी - रस्ते, नाले इ. - निर्माण करण्यासाठी सरकारला ह्या जमिनीचा काही भाग हवा होता आणि तो सरकारने कसा घ्यावा ह्याविषयी सरकार आणि जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई पेस्तनजी अशा जमीनधारकांमध्ये विवाद होता.

किल्ल्याच्या उत्तरेकडील सर्वच जमीन ’फोरा जमीन’ ह्या वर्णनाखाली येते आणि त्या भागात जाणार्‍या रस्त्यांना ’फोरास रस्ते’ असे सार्वत्रिक नाव होते.  कालक्रमाने हे रस्ते जेव्हा पक्के बांधून वापरात आले तेव्हा त्यांना स्वत:ची अलगअलग नावे मिळाली आणि केवळ एकाच रस्त्याचे म्हणून हे नाव शिल्लक उरले. बेलासिस रोड (जहांगिर बोमन बेहराम मार्ग) आणि ग्रॅंट रोड ह्यांना जोडणार्‍या रस्त्यालाच काय ते हे नाव उरले आहे.  १९०९ सालच्या इंपीरिअल गॅझेटमधील नकाशात ह्याचा उल्लेख ’कामाठीपुरा रोड’ असा केला आहे. त्या नकाशाचाहि तुकडा खाली जोडला आहे.


३३) फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) - फ्लोरा फाउंटन हे मूळचे फ्रियर फाउंटन आणि सर बार्टल फ्रियर ह्यांच्या नावे ते विक्टोरिया गार्डनमध्ये उभे राहायचे होते.  अग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी नावाची संस्था ह्या प्रस्तावामागे होती पण तिच्याजवळचे पैसे संपल्यामुळे त्यावेळचे क्रॉफर्ड ह्यांनी पुढाकार घेऊन त्याला सध्याच्या जागी आणले.  कर्सेटजी फर्दूनजी ह्यांची मोठी देणगीहि ह्या कामी लागली.  मूळच्या चर्चगेटच्या जागीच ते आता उभे आहे.  फाउंटनवरील फ्लोरा देवतेवरून हे नाव पडले आहे.  खालील चार स्त्रिया हिंदुस्तानात उत्पन्न होणार्‍या चार शेतमालांची प्रतीके असून डॉल्फिन्स, सिंह अशा प्राण्याच्या शिल्पांनी त्याला शोभा आणली आहे.  त्याची सध्याची दोन चित्रे आणि १८७१ मध्ये ’सायंटिफिक अमेरिकन’ नियतकालिकाच्या अंकात दिसणारे एक चित्र पुढे दाखवीत आहे. (श्रेय )




३४) जेकब सर्कल - सातरस्ता (गाडगेमहाराज चौक) -  मे.ज. सर जॉर्ज जेकब (१८०५-६१) ह्यांचे नाव मुंबई प्रांतात प्रामुख्याने सावंतवाडी, कोल्हापूर आणि काठेवाड संस्थानांमध्ये मुंबईकरांचे प्रतिनिधि म्हणून माहीत आहे.  कोल्हापुरात १८५७ च्या काळात संस्थान शांत ठेवण्याच्या कार्यात त्यांनी विशेष कर्तबगारी दर्शविली.  त्यांचे नाव मुंबईतील ह्या प्रमुख चौकास देण्यात आले होते.  चौकात सात मोठे रस्ते एकत्र मिळत असल्याने स्थानिक रहिवासी चौकास सातरस्ता ह्या प्रसिद्ध नावानेहि ओळखतात.  चौकातील कारंजे जेकब ह्यांच्या मानलेल्या मुलीने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे.  जेकब हे मराठी आणि संस्कृत भाषांचे अभ्यासकहि होते.  गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचे त्यांनी वाचन केले होते.

सर जॉर्ज जेकब (श्रेय) 



३५) कामाठीपुरा - बेलासिस रोड (जहांगीर बोमन बेहराम मार्ग), सुखलाजी स्ट्रीट, ग्रॅंट रोड (मौलाना शौकत अली मार्ग) आणि डंकन रोड (मौलाना आझाद मार्ग) ह्या मर्यादा असलेल्या भागास कामाठीपुरा असे नाव तेथे वसतीला आलेल्या कामाठी-कोमटी लोकांवरून पडले आहे.  निजामाच्या प्रदेशातील हे मूळचे लोक १८व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसात कामधंद्यासाठी मुंबईत आले आणि ह्या भागात स्थायिक झाले. प्रथमपासून हा भाग निम्नस्तरातील जनतेच्या वस्तीचा आणि तेथे चालणारा वेश्याव्यवसायहि असाच त्या दिवसांपासूनचा आहे.  (१८व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये मुंबईत रामा कोमटी नावाचा सधन हिंदु राहात असे.  कान्होजी आंग्रे ह्यांच्याशी गुप्त संधान बांधल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी १७२०मध्ये त्याच्यावर खोटा ’कांगारू’ खटला चालवून त्याला आयुष्यातून उठविले.  त्याच्याशी कामाठीपुर्‍याचा संबंध लावल्याचे मी वाचले आहे पण त्यात मलातरी काही अर्थ दिसत नाही.  ह्या खटल्याचा वृत्तान्त मुंबई उच्च न्यायालयाच्या  ह्या संस्थळावर  वाचायला मिळतो.  ह्या अनुसार हा खटला १७२० साली झाला आणि रामा कोमटी हा कोमटी नसून राम कामत नावाचा शेणवी जातीचा गृहस्थ होता.  तसेच १७८४ मध्ये महालक्ष्मीजवळ समुद्राला हॉर्नबी वेलार्ड हा बांध घालण्यापूर्वी सध्याचा कामाठीफुरा हा पाण्याखालीच होता.  ह्या दोन कारणांसाठी रामा कोमटीचे नाव कामाठीपुर्‍याशी जोडता येत नाही.)

३६-३९) केनेडी ब्रिज, मॅथ्यू रोड, फ्रेंच ब्रिज आणि गवालिया टॅंक - ही चारहि स्थाने खाली जोडलेल्या इंपीरिअल गॅझेट १९०९ मधील नकाशाच्या तुकडयात दिसत आहेत.  तसेच केनेडी, मॅथ्यू, फ्रेंच ह्या तिघांचे पुतळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात एकत्र ठेवलेले आहेत त्याचे चित्रहि दिसत आहे.



कर्नल जे.पी.केनेडी कन्सल्टिंग एंजिनीअर म्हणून, कर्नल पी.टी.फ्रेंच हे रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून आणि फ्रान्सिस मॅथ्यू हे चीफ एंजिनीअर आणि नंतर एजंट (मुख्य अधिकारी) म्हणून असे तिघेहि १८६० ते १८८० च्या दशकांमध्ये BB&CI रेल्वेच्या कामाशी संबंधित असे उच्च अधिकारी होते.  फ्रेंच ह्यांच्याविषयी आणखी मनोरंजक माहिती म्हणजे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची समज आणि गोडी असावी असे जालावरील उल्लेखांवरून वाटते.  बहुतेक इंग्रजांना पाश्चात्य संगीताची सवय असल्याने हिंदुस्तानी संगीत समजत नसे आणि कंटाळवाणे वाटे.  त्याचे कारण म्हणजे बहुतेकांची ह्या संगीताशी ओळख संस्थानिकांच्या दरबारात होणार्‍या नाचगाण्यांमधून होते आणि खर्‍या गवयांचे गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असेहि एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे.  पी.टी.फ्रेंच हे ह्या बाबतीत थोडे निराळे असावेत कारण त्यांनी मेहनतीने गोळा केलेल्या भारतीय वाद्यांच्या संग्रहाचे - जो संग्रह त्यांनी नंतर रॉयल आयरिश ऍकॅडेमीकडे सुपूर्द केला - कर्नल मेडोज टेलर  ह्यांनी केलेले परीक्षण जालावर येथे  पाहता येते.

१८५०-६० पर्यंत गवालिया टॅंक हा भाग जवळजवळ मोकळाच आणि ग्रामीण भागासारखा होता.  गवळी आणि गुराखी आपली गुरे चरण्यासाठी आणि धुण्यासाठी येथे आणत असत. हे गायीम्हशी धुण्याचे काम ज्या तलावावर चालत असे गवळी तलाव असे नाव पडले.  चालू ’गवालिया’ हे नाव मूळ नावाचे बदललेले रूप दिसते कारण १९०९ च्या नकाशात त्याचे नाव Gowli Tank गवळी तलाव असेच दर्शविले आहे.  १९०९ नंतर लवकरच हा तलाव बुजविण्यात आला कारण शेपर्ड ह्यांनी तसा उल्लेख केला आहे.  सध्याच्या नाना चौकातून केम्प्स कॉर्नरमार्गे भुलाभाई देसाई मार्ग (Warden Road) आणि एल. जगमोहनदास मार्ग (Nepean Sea Road) ह्यांच्याकडे जाणार्‍या रस्त्याला प्रथम गवालिया टॅंक रोड असे नाव होते आणि ते तसेच चालू राहिले. बुजवलेल्या तलावाच्या जागी मोकळे मैदान निर्माण झाले.  ऑगस्ट ८, १९४२ ह्या दिवशी महात्मा गांधींनी ह्या मैदानामध्ये छोडो भारत - Quit India - ही घोषणा करून स्वातन्त्र्यलढयाचे शेवटचे पान उलटले.  त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलीकडच्या काळात रस्त्याचे नाव ऑगस्ट क्रान्ति मार्ग आणि मैदानाचे नाव ऑगस्ट क्रान्ति मैदान असे बदलण्यात आले.  गूगल मॅप्समधील मैदानाचे चालू चित्र आणि त्यामध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे चित्र खाली दर्शवीत आहे.  (श्रेय.)





४०-४३) ग्रीन स्ट्रीट, एल्फिन्स्टन सर्कल (हॉर्निमन सर्कल), हमाम स्ट्रीट (अंबालाल दोशी मार्ग). -  मुंबईतील प्रसिद्ध टाउन हॉलसमोरील जागेस ब्रिटिश दिवसांमध्ये एल्फिन्स्टन सर्कल असे नाव होते.  त्या मोकळ्या जागेचा उपयोग निर्यातीसाठी मुंबईत आणलेल्या कापसाच्या साठवणीसाठीहि केला जात असे आणि त्या कारणाने त्या मोकळ्या जागेस कॉटन ग्रीन असे म्हणत असत.  ही साठवणीची जागा कुलाब्यात नेईपर्यंत ’कॉटन ग्रीन’ एल्फिन्स्टन सर्कल मध्येच होते.  कॉटन ग्रीन तेथून हलले तरी त्याची आठवण अद्यापि  ’ग्रीन स्ट्रीट’ ह्या रस्त्याच्या नावात टिकून आहे.  स्वातन्त्र्यानंतर एल्फिन्स्टन सर्कलचे नाव बदलून ’हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले आहे.  खालील चित्रामध्ये हमाम स्ट्रीट आणि एल्फिन्स्टन सर्कल दिसत आहे.  ग्रीन स्ट्रीट ह्या नकाशाच्या तुकडयात दिसत नाही पण हमाम स्ट्रीटपासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता म्हणजे ग्रीन स्ट्रीट.  गूगल मॅप्समध्ये हा नावासकट दिसतो.


बी.जी.हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश वृत्तपत्रकार पत्रकारितेच्या व्यवसायासाठी हिंदुस्तानात आले आणि ब्रिटिश राजवटीचे विरोधक आणि स्वातन्त्र्य चळवळीचे पाठिराखे बनले.  मुंबईतील बॉंबे क्रॉनिकलचे संपादक असतांना जालियनवाला बागेसंबंधीच्या त्यांच्या लिखाणामुळे त्यांना हिंदुस्तान सोडावा लागला पण परत येऊन त्यांनी पुन: ते पत्र हाती घेतले.  १९२९ नंतर त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले.

खाली ’बॉंबे क्रॉनिकल’चा मार्च १,१९१९ चा अंक दाखवीत आहे. (श्रेय.) अंकामध्ये मध्यभागी 'The Satyagraha Vow' अशा शीर्षकाखाली रौलट बिलाविरुद्ध महात्मा गांधींची सत्याग्रहाची घोषणा दाखविली आहे.  त्याखाली 'Mr. Gandhi's Manifesto' दिसतो.  त्याच्या शेजारी दोन कॉलम्समध्ये 'Signatories to the Pledge' अशी नावे आहेत.  डाव्या बाजूचे पहिले नाव 'Mohanadas Karamchand Gandhi, Satyagraha Ashram, SabaramatI'  आणि त्याखालचे नाव ’Vallabhbhai J. Patel, Bar-at-Law, Ahmedabad'  अशी आहेत.  उजव्या बाजूचे पहिले नाव B.G.Horniman, Editor, "The Bombay Chronicle," Bombay असे आहे.  पुढे डी.डी.साठे (गिरगावातील डी.डी.साठे मार्ग), अवंतिकाबाई गोखले (अवंतिकाबाई गोखले मार्ग), सरोजिनी नायडू अशीहि नावे दिसतात.


ग्रीन स्ट्रीटजवळच ’हमाम स्ट्रीट’ आहे.  येथे कधीकाळी असलेल्या सार्वजनिक स्नानगृहावरून ते नाव पडले.

४४) किंग्ज सर्कल स्टेशन - २०व्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबईच्या वाढत्या वस्तीला राहण्यासाठी जागा आणि पाणीपुरवठा-मलनि:सारणासारख्या बाबी पुरविण्यासाठी विचार करावयास हवा अशी जाणीव मुंबई सरकार आणि महानगरपालिकेस होऊ लागली होती आणि त्यातूनच १९०९च्या सुमारास Bombay Development Committee, Bombay Improvement Trust अशांची निर्मिती झाली होती.  त्यांच्या शिफारशीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दादर-माटुंगा ह्यांच्या पूर्वेकडील भाग वस्तीयोग्य करणे असा होता आणि त्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटपासून शीवपर्यंत १५० फूट रुंदीचा रस्ता बांधणे हा विचार समाविष्ट होता.  प्रत्यक्षात इतका मोठा रस्ता झाला नाही पण नायगाव-दादर-माटुंगा भागात विन्सेंट रोड (सध्याचा बाबासाहेब आंबेडकर मार्ग) नावाचा रुंद रस्ता बांधला गेला. विन्सेंट हे मुंबईचे पोलिस कमिशनर होते.  ह्या रस्त्याच्या शीवकडील बाजूचा शेवट एका वर्तुळाकृति बागेमध्ये झाला आणि त्या बागेस ’किंग्ज सर्कल’ असे नाव दिले गेले.  हल्ली ह्याच बागेस माहेश्वरी उद्यान असे नाव आहे पण जुने किंग्ज सर्कल एका उपनगरी स्थानकाच्या रूपाने अजून जिवंत आहे.  अंधेरी ह्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकाकडे जाणार्‍या मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडया हार्बर लाईनने येऊन शीव आणि माटुंगा ह्या मध्य रेल्वेच्या स्टेशनांदरम्यान पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे येऊन अंधेरीकडे जातात.  येथे असलेल्या स्टेशनास किंग्ज सर्कल असे नाव आहे.  (किंग्ज सर्कलसंबंधित पुढील चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.)



४५-५०) खोताची वाडी, कांदेवाडी, करेलवाडी, गायवाडी, मुगभाट, झावबाची वाडी अशा गिरगावातील छोटया गल्ल्या.  - खोती हे वतन कोकण प्रान्तातील पारंपारिक वतन आहे.  गावातील सरकारी उत्पन्न सरकारकडे भरण्याचा पत्कर खोत घेतो आणि त्या बदल्यात जमीन कुळाकडे कमीअधिक काळासाठी कसायला देऊन त्यांच्याकडून उत्पन्न गोळा करतो.  दादोबा वामन खोत ह्या पाठारे प्रभु व्यक्तीने ह्या भागातील खोती इनाम सरकारातून मिळविले.  त्याच्यावरून ह्या भागास खोताची वाडी हे नाव मिळाले.

कांदेवाडीमध्ये कांदे साठवण्याची वखार - godown - होती आणि शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत ती तेथे असावी असे दिसते.

करेलवाडी - हे नाव मूळचे करळवाडी असे असावे कारण तेथे मिळणार्‍या ’Karel’ जातीच्या दगडावरून हे नाव पडले आहे असे शेपर्ड लिहितात.  मोल्सवर्थच्या १८३१ च्या कोशात ’करळ’ असा शब्द असून त्याचा अर्थ ’a soft sandy stone’ असा दिला आहे.

गायवाडी - गायी ठेवण्याची जागा असा ह्याचा स्पष्ट अर्थ शेपर्ड देतात.  मुंबईत अजूनहि दोनतीन गायवाडया आहेत असे ते नोंदवतात. उदा. लेडी जमशेटजी रोडपासून माहीम बझारकडे जाणारा रस्ता.  आज हा रस्ता कोणता असावा असा तर्कच करावा लागेल.

मुगभाट - दा कुन्हा ह्यांच्या मताने ’मुंगा’ नावाचा कोळी जमातीमधील कोणी एक पुढारी व्यक्ति होऊन गेला. त्याचे ’भाट’ (शेत) ते मुगभाट.  रा.ब.जोशींच्या मते ’मुगाचे शेत’ अशा अर्थाने हे नाव पडले आहे. (मुंबादेवीच्या नावाशीहि मुंगा कोळ्याचा संबंध कोठेकोठे लावला आहे.  ’मुंगादेवी’चे ’मुंबादेवी’ असे रूपान्तर झाले असे म्हणतात.)

झावबाची वाडी हे नाव विश्वनाथ विठोजी झावबा ह्यांच्या नावावरून पडले आहे कारण १८व्या शतकात त्यांनी ही वाडी - जिचे तत्पूर्वीचे नाव रणबिल वाडी असे शेपर्ड नोंदवतात - विकत घेतली आणि ती त्यांच्या वंशजांकडे वारसाहक्काने जात राहिली.  विश्वनाथ ह्यांचे नातू विठोबा झावबा ह्यांनी तेथील ’झावबा राम मंदिर’ ह्या नावाने ओळखले जाणारे देऊळ १८८२ मध्ये बांधले.  विश्वनाथ ह्यांचे एक पणतू नारायण मोरोजी हे तेथे शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत राहात होते.

५१) लालबाग - जहाजबांधणी व्यवसायातील प्रख्यात वाडिया कुटुंबातील लवजी वाडिया ह्या मूळ व्यक्तीचे पणतू दादाभाई पेस्तनजी हे सध्याच्या लालबाग-परळ भागातील जमिनीचे मालक होते आणि तेथील त्यांच्या बंगल्याला ’लालबाग’ असे नाव होते. ओरिएंटल बॅंक १८७५ मध्ये बुडाली त्यात पेस्तनजींची बहुतेक मालमत्ता नष्ट झाली.  ही माहिती जेम्स डग्लस ह्यांच्या 'Glimpses of Old Bombay' ह्या १८७५ मध्ये छापलेल्या पुस्तकात मिळते (पान १११).  ह्यावरून मी असा तर्क करतो की त्या भागात नंतर निर्माण झालेल्या वस्तीला लालबाग बंगल्यावरून ’लालबाग’ हे नाव मिळाले असावे.

५२) लेडी जमशेटजी रोड - दादर-माहीम भागातील ह्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधणीची कथा आर.पी.करकारिया ह्यांनी २२ सप्टेंबर १९१०च्या 'The Advocate of India' मध्ये सांगितली आणि ती शेपर्ड ह्यांनी नोंदवली आहे.  वान्द्रे आणि त्यापलीकडील भाग हा मुंबईपासून माहीम खाडीने अलग ठेवलेला होता आणि इकडून तिकडे येण्याजाण्यासाठी नावांचा वापर केला जात असे.  १८२०-३० पासून हे दोन भाग जोडून सलग करण्याचे प्रयत्न मुंबईतील सधन व्यापार्‍यांकडून चालू होते पण त्यासाठी पुरेसे पैसे उभे करता आलेले नव्हते.  खाडीमध्ये नंतर एकदा वीस नावा बुडून सर्व प्रवासी मृत्यु पावले तेव्हा सर जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी सर्व खर्च स्वत: करून हे काम अंगावर घेण्याचे ठरविले.  एकूण २ लाखाहून अधिक खर्च करून हा भराव आणि रस्ता १८५४ च्या सुमारास बांधला गेला आणि जमशेटजींची पत्नी लेडी जमशेटजी ह्यांचे नाव त्या रस्त्याला देण्यात आले.

No comments:

Post a Comment