Tuesday, January 7, 2014

हुंडीव्यवहार

ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले.  तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे.  अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय.

हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो.  हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती.  बाजारपेठांमधील रीतिरिवाज आणि दूरदूरच्या व्यापारी पेढयांचा एकमेकांच्या पतीवरील विश्वास ह्यांवर हुंडीपद्धत अवलंबून होती.  पुरेशा संख्येने बॅंकांच्या शाखा उपलब्ध नसल्याने १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हिंदुस्तानी व्यापारीवर्ग पैशाच्या देवाणघेवाणीसाठी प्रामुख्याने हुंडीव्यवहारावर अवलंबून असे.  तदनंतर तिचा संकोच होत जाऊन आता हा शब्द क्वचितच कानी पडतो.  हुंडीचाच दुसरा प्रकार, ज्याला ’हवाला’ असे नाव आहे, तो मात्र जगभर पसरलेल्या भारतीय, पाकिस्तानी आणि अन्य आशियाई लोकांचा स्वदेशाकडे पैसे पाठविण्याचा आवडता मार्ग आहे.  हवाल्याचा उपयोग काळा पैसा पांढरा करणे, अमली वस्तूंच्या विक्रीची किंमत चुकती करणे, दहशतवादी संघटनांना पैसा पुरविणे, विनिमय कायद्यांचे उल्लंघन करणे ह्यासाठीहि केला जाऊ शकत असल्याने जगभरच्या गुप्तहेर संघटना आणि पोलिस दले हवाल्याकडे संशयी नजरेने पाहतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

हुंडीचा उपयोग कोठे होत असे?  एक उदाहरण घेऊ.  १७९८ साली पुण्याहून बाळंभट माटे आपल्या आईला काशीयात्रा घडवून आणण्यासाठी काशीयात्रेला जात आहेत.  रास्तेवाडयावर ते पूजेसाठी जातात तेथे त्यांच्या कानावर असे पडते की रास्त्यांच्या घरातील काही मंडळी काशीयात्रेला जाणार आहेत.  त्यांच्याबरोबर आपणहि गेल्यास चांगली सुरक्षित सोबत मिळेल असा विचार त्यांच्या मनात येऊन एके दिवशी धाडसाने थोरल्या वहिनीसाहेबांना ते ’मीहि तुमच्याबरोबर येऊ का’ असे ते विचारतात.  वहिनीसाहेबहि हो म्हणतात आणि अचानक ही दुर्मिळ संधि भटजीबोवांना उपलब्ध होते.

काशीच्या प्रवासासाठी आणि तेथील खर्च अणि दानधर्मासाठी त्यांना तीनशे रुपये बरोबर न्यायची इच्छा आहे. गेली चौदापंधरा वर्षे वार्षिक रमण्यात मिळालेली पाचदहा रुपयांची दक्षिणा, सरकारवाडयावर दरवर्षी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवतात तेथे मिळालेली दक्षिणा, एका यजमानासाठी केलेले वटवृक्षाला लाख प्रदक्षिणा घालण्याचे अनुष्ठान आणि रोजच्या पूजाअर्चा, रुद्राची आवर्तने ह्यांच्या परचुटन दक्षिणा अशी अडीचतीनशेची पुंजी त्यांनी जमवली आहे.  काशीयात्रेतून त्यांना स्वत:ला आणि आईला पुण्यप्राप्ति तर झाली असतीच पण परतीच्या वेळी गंगेच्या पाण्याची कावड आणून ते पाणी गडूगडूने यजमानांना विकून यात्रेतली सगळी गुंतवणूक दामदुपटीने परत मिळविता येईल हाहि व्यावहारिक विचार बाळंभटांच्या मनात आहे

आपल्या कमरेभोवती तीनशेचा कसा बांधून बाळंभट जाऊ शकतात पण त्यामागे अनेक धोके संभवतात.  सर्वात मोठा धोका म्हणजे वाटेत चोर-दरोडेखोर अथवा फासिगार ठगांच्या टोळ्या त्यांना लुटून त्यांचा पैसा काढून घेतील आणि पैशाच्या लोभाने त्यांना मारूनहि टाकतील.  पेंढार्‍यांच्या झुंडी वावटळासारख्या कोठून बाहेर पडून गरीब वाटसरांना लुटतील ह्याचा नेम नाही.  पैसे वाटेत कोठेतरी हरवण्याचीहि शक्यता आहेच.  तत्कालीन दळणवळणाची साधने पाहता असे काही झाले तर बिचार्‍या बाळंभटाचे हाल कुत्रा खाणार नाही अशी वेळ येईल.  त्यांच्या सुदैवाने ह्यावर एक तोडगा उपलब्ध आहे.  पुण्याच्या बाजारपेठेत अशा काही पेढया आणि सावकार आहेत की ज्यांचे हिंदुस्थानभरच्या पेढयांबरोबर व्यापारी संबंध आणि हिशेबाची खाती आहेत.  बाळंभट बुधवारातल्या चिपळूणकरांच्या पेढीवर जातात आणि काशीमधल्या सावकारावर हुंडी मागतात.  चिपळूणकरांचा कारकून भटजींना हुंडणावळीचा दर - commission - दरसदे म्हणजे दर शेकडा २ रुपये पडेल असे सांगतो पण भटजीबोवा तसे व्यवहारी आहेत.  मी दरिद्री ब्राह्मण, केवळ आईची इच्छा मरण्यापूर्वी पुरी करायची म्हणून पोटाला चिमटा घेऊन ही रक्कम कशीबशी उभी केली आहे अशी विनवणी ते करतात.  चार अन्य प्रतिष्ठितांच्या ओळखीहि आणतात आणि अखेर दरसदे १॥ रुपया हुंडणावळीवर सौदा तुटतो.  बाळंभट ३०४॥ रुपये चिपळूणकरांच्या पेढीवर आणून भरणा करतात.  भटजीबोवांनी ह्या रकमेचा मोठा भाग त्यांच्या दक्षिणेमधली नाणी साठवून उभा केला आहेत.  साहजिकच ती नाणी म्हणजे वेगवेगळ्या पेठांमध्ये चालणारी, कमीजास्त मान्यता असलेली, कोरी, मळकी, अनेक छाप असलेली आणि अनेक सावकारांनी आपापल्या खुणा उमटवलेली लहान मोठी नाणी आणि खुर्दा आहे.  भटजीबोवांना काशीमध्ये हवे आहेत इंग्रजी सिक्का रुपये.  चिपळूकरांचे कारकून प्रत्येक नाणे पारखून इंग्रजी सिक्क्याच्या तुलनेत त्याचा बट्टा  ठरवून बाळंभटांचे ३०४॥ रुपये सिक्का रुपयांमध्ये २८०॥=। रुपयांइतकेच (२८० रु १० आ. १ पै.) आहेत असे सांगतात.  भटजीबोवांना हा मोठाच धक्का आहे पण आता मागे परतायचे नाही असा त्यांचा निर्धार आहे.  बायकोच्या दोन तोळ्याच्या बांगडया विकून ते अजून २५-३० रुपये उभे करतात आणि अखेर दुकानावर दोन तीन चकरा मारल्यावर काशीवाले हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर चिपळूकरांनी लिहिलेली आणि बाळंभटांचे नाव त्यात ’राखिले’ म्हणून घातलेली दर्शनी शाहजोग हुंडी घेऊन बाळंभट समाधानाने घरी येतात आणि प्रवासाच्या तयारीला लागतात.  हुंडीमध्ये हुंडी लिहिण्याची तारीख वैशाख शु १ शके १७२० अशी आहे आणि हरकिसनदास लखमीदास ह्यांनी हुंडीची रक्कम ज्येष्ठ व १ ला म्हणजे १॥ महिन्यानंतर हुंडी दाखल झाल्यावर बाळंभटांना द्यायची आहे.  चिपळूणकरांनी त्याच दिवशी हरकिसनदास लखमीदास पेढीला त्यांच्यावर अशी हुंडी लिहिल्याचे पेठपत्र जासूदाबरोबर वेगळे रवाना केले आहे.

भटजीबोवांच्या सुदैवाने आणि काशीविश्वेश्वराच्या असीम कृपेने ते स्वत:, पत्नी आणि आई हातीपायी धड महिना-सवामहिन्यातच काशीत हुंडीसकट पोहोचतात.  तेथे आपले दूरचे आप्त मोरशास्त्री कर्वे ह्यांच्याकडे ते सर्वजण उतरतात.  मोरभट २०-२५ वर्षांपूर्वी न्याय वाचण्यासाठी काशीला गेलेले असतात पण त्यांचे तेथे बस्तान चांगले बसल्यामुळे आता ते काशीकरच झालेले असतात.  त्यांच्याच ओळखीने बाळंभट चांगली पत असलेल्या वरजीवनदास माधवदास ह्यांच्या पेढीवर जातात आणि वरजीवनदासांना विनंति करून आपल्या हुंडीचे पैसे त्यांनी मिळवून द्यावे अशी विनंति करतात.  वरजीवनदास आपला लेख हुंडीवर लिहून आपला गुमास्ता बाळंभटांबरोबर देतात आणि सर्वजण हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर पोहोचतात.  बाळंभट तेथे हुंडी दाखवतात.  ती उलटसुलट नीट तपासून आणि गुमास्त्याकडून हे बाळंभटच आहेत अशी शहानिशा करून घेतल्यावर हुंडी ‘सकारली‘ जाऊन बाळंभटांच्या हातात ३०० कलदार सिक्का रुपये पडतात आणि तशी नोंद हुंडीवर केली जाते.  चिपळूणकरांचे खाते हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या वह्यांमध्ये आहे आणि त्यामध्ये पुरेशी रक्कम जमा आहे.  त्या खात्यात ही रक्कम आता नावे लिहिली जाईल आणि हुंडीचा खोका आता जासूदाबरोबर उलट चिपळूणकरांकडे पोहोचेल.  तेथे ही ‘खडी हुंडी‘ आणि हा व्यवहार संपेल.  मधल्या काळात बाळंभटांच्या मागे काशीक्षेत्रातले पंडे लागलेले आहेत.  बाळंभटांचे ३०० रुपये संपवण्याचा पत्कर आता ते पंडे घेतीलच!

वरच्या गोष्टीतील हुंडी दर्शनी आणि शाहजोग होती.  म्हणजे तिचे पैसे हुंडी पटवण्यासाठी म्हणजे ‘सकारण्या‘साठी पुढे आल्यावर लगेच द्यावयास हवेत.  तसे न दिल्यास हुंडीधारकास त्या विलंबाचे व्याज मिळते.  हुंडी शाहजोग आहे म्हणजे पेठेतील कोणी प्रतिष्ठित आणि पतदार व्यक्ति मध्यस्थ म्हणून उभे राहिल्यावरच तिचे पैसे धारकास मिळतात.  हुंडी शाहजोग न करता धनीजोग (ज्याच्यापाशी हुंडी आहे अशा कोणासहि पैसे मिळतील), नामजोग (ज्याचे नाव हुंडीमध्ये आहे त्याला पैसे मिळतील), निशाजोग (ज्याच्या शरीरावर वर्णिलेल्या खुणा आहेत अशा व्यक्तीलाच पैसे मिळतील) अशा प्रकारची असू शकते.  तसेच ती जोखमी हुंडी असू शकते.  एक व्यापारी दुसर्‍याला काही माल पाठवतो आणि मालाच्या किंमतीच्या रकमेची हुंडी खरीददारावर लिहितो.  माल कोठल्या वाहनाने येत आहे हेहि नोंदवतो.  ही जोखमी हुंडी तो एका दलालाला विकतो आणि आणि दलाली वजा करून मालाची किंमत त्याला मिळून जाते.  माल खरीददाराकडे पोहोचल्यावर दलाल त्याच्याकडे हुंडी पाठवून तिचे पैसे वसूल करतो.  माल पोहोचेपर्यंत मालाचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी खरीददारावर नाही.  अशा रीतीने विकणारा आणि खरेदी करणारा ह्या दोघांचीहि मालवाहतुकीमधील जोखीम दलाल स्वीकारतो म्हणून ह्या हुंडीला जोखमी हुंडी म्हणतात.  कधीकधी परक्या गावात गरजेप्रमाणे पैशाची उचल करता यावी म्हणून व्यापारी मूळ गावातून भलावणपत्र घेऊन येतो.  ह्या पत्राच्या आधारे त्याला हवी ती रक्कम वेळोवेळी मिळते.  भलावणपत्र लिहिणारा, ते जवळ बाळगणारा आणि पैसा देणारा आपल्याआपल्यामधील हिशेब नंतर पूर्ण करतात.

दर्शनीऐवजी हुंडी मुदती असू शकते म्हणजे तिचे पैसे हुंडी दाखविल्यानंतर विशिष्ट मुदतीनंतर मिळतात.

बाळंभटांना मिळालेली हुंडी एका ठराविक पद्धतीने आणि व्यापार्‍यांमध्ये वापरात असलेल्या महाजनी भाषेत लिहिली असावी.  अशा एका हुंडीतील मजकूर पहा:

निशानी 
हमारे घरु खाते नाम मांडना
दस्तखत ब्रिजकिशोर भार्गव के हुंडी लिखे मुजिब सीकर देसी

श्रीरामजी

सिध श्री पटना सुभस्ताने चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद जोग श्री जयपुर से लिखी ब्रिजकिशोर भार्गव की आसिस बाचना.  अपरंच हुंडी एक रुपिया २००० अक्षरे दो हजार के निमे रुपिया एक हजार का दुना यहां रखा साह श्री पुनमचंदजी हरकचंदजी मांगसिर बद बारस शाहजोग रुपिया चलान का देना.  संबत १९९० मिति मांगसिर सुद बारस

पाठीमागच्या बाजूस
रु २०००
नेमे नेमे रुपिया पांच सौ का चौगुना पूरा दो हजार कर दीजो.

(अर्थ: पेढीच्या शिक्क्याखाली
आमच्या पेढीच्या खात्यात नावे लिहा.
ब्रिजकिशोर भार्गव ह्यांनी हाताने लिहिलेली हुंडी.

श्रीराम

सिद्धि.  शुभस्थान पटना येथील चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद ह्यांना श्रेष्ठ शहर श्री जयपूरहून ब्रिजकिशोर भार्गव ह्यांचे आशीर्वाद वाचावे.  आणखी म्हणजे  एक हुंडी रुपये २००० अक्षरांनी दोन हजार ह्याचे निम्मे रुपये एक हजार ह्याची दुप्पट. येथे राखिले शाह श्री पुनमचंदजी हरकचंदजी शाहजोग.  मार्गशीर्ष वद्य १२ ला चलनी रुपये देणे.  संवत १९९० मिति मार्गशीर्ष वद्य १२.

मागील बाजूवर

रु २०००
निम्म्याचे निम्मे रुपये पांचशे ची चौपट पुरे दोन हजार करावे.

अशा एका हुंडीचे चित्र पहा:


पुण्याच्या सावकारी पेठेत हुंडी आणि चलनांचे व्यवहार कसे चालत असत ह्याची उत्तम माहिती ना.गो.चापेकरलिखित ’पेशवाईच्या सावलीत’ ह्या पुस्तकामध्ये मिळते.  चिपळूणकर सावकार आणि तुळशीबागवाले घराण्यांच्या अनेक वर्षांच्या हिशेबवह्या तपासून संकलित केलेली अशी ह्या पुस्तकातील माहिती पेशवे काळातील अर्थव्यवहार, सामाजिक चालीरीती अशा बाबींवर प्रकाश टाकते.  त्यातील पुढील दोन उतारे वानगीदाखल पहा:


चिपळूणकरांच्या वह्यातील हा एक व्यवहार आहे.  असे दिसते की सगुणाबाई पंचनदीकर ह्या एका प्रतिष्ठित घराण्यातील बाई काशीयात्रेला जाणार आहेत.  त्यासाठी तरतूद म्हणून त्यांनी चिपळूणकरांचे तेव्हाचे कर्ते पुरुष दाजिबा चिपळूणकर ह्यांच्याकडे आपले कोणी आप्त/सेवक/परिचित असे राघोपंत थत्ते ह्यांच्या हस्ते काही रक्कम शके १७४६ (सन १८२४) पौष महिन्यात सोपवली आहे.  त्या रकमेमध्ये ३१५ सिक्का रुपयाची नाणी होती आणि बाकी रक्कम ३०८ रु ६ आणे २ पैसे हे चांदवडी रुपये होते.  चांदवड रुपये सिक्का रुपयात बदलण्यासाठी दर शेकडा ६ रु. ५ आ. १ पै. ह्या दराने १९ रु. ८ आ. १ पै. इतका बट्टा चिपळूणकरांनी घेतला.  (३०८ रु ६ आणे २ पैसे भागिले १०० गुणिले ६ रु. ५ आ. १ पै. = १९ रु. ८ आ. १ पै. )  बट्टा वजा जाता उरले सिक्का २८८ रु १४ आ. १ पै.  मूळचेच सिक्का असलेले ३१५ रु ह्यात मिळवून एकूण रक्कम झाली सिक्का ६०३ रु १४ आ. १ पै.  ह्या रकमेची काशीवरची हुंडी जगजीवदास बुक्खीदास ह्यांच्या पेढीवरून करून घेण्यासाठी - चिपळूणकरांची अडत काशीमध्ये नसावी म्हणून दुसर्‍या पेढीवरून हुंडी घेतली - दरशेकडा १॥ रुपये इतकी हुंडणावळ पडली.  ती पेढी प्रथम १।।। रुपये दर मागत होती पण थोडी घासाघीस करून १॥ वर दर आणला. ह्या दराने ६०३ रु १४ आ. १ पै. ह्या रकमेवर हुंडणावळ होते ८ रु १५ आ.*  १९ रु. ८ आ. १ पै. इतका जो बट्टा चिपळूणकरांनी घेतला आहे त्यावरची हुंडणावळ होते ४ आ. ३ पै.  ८ रु १५ आ. मधून हा आकडा वजा केला की उरते देय हुंडणावळ ८ रु. १० आ. १ पै.  ही हुंडणावळ ६०३ रु १४ आ. १ पै.  मधून वजा करून हुंडीची रक्कम उरते ५९५ रु. ४ आ.  ही रक्कम बाईंना काशीमध्ये वैशाख शु १ शके १७४७ ह्या दिवशी मिळेल.

(* ह्या आकडेमोडीत मला एक अडचण जाणवते.  शेकडा दीड रुपया प्रमाणे ६०३ रु १४ आ. १ पै. वर हुंडणावळ ९ रु.हून थोडी जास्तच होईल.  येथे ती ८ रु १५ आ. अशी कशी काढली आहे?  चिपळूणकरांच्या वाकबगार कारकुनांकडून अशी चूक हे शक्य वाटत नाही.  ह्याचे स्पष्टीकरण कोणी देऊ शकेल काय?)


ह्यापुढे दोन हुंडीव्यवहार दिसत आहेत.  पहिल्यामध्ये काशीवरची ५०० ची हुंडी ज्या कोणाकडे होती त्याच्याकडून ४७५ रोख देऊन विकत घेतली.  त्याला बहुधा रोख रकमेची निकड असेल वा हुंडी पटविण्यासाठी काशीला जायची त्याची तयारी नसेल.  ह्यातील नफा रु २५ कसर खात्यात (discount) जमा केला आहे.  त्याच्यापुढे असे दिसते की कोणा बाळकृष्ण आपाजीला उज्जैनीत ५०० ची गरज आहे.  तेथे चिपळूणकरांची अडत नसावी म्हणून बाळकृष्ण आपाजीला औरंगाबादेवर त्या रकमेची हुंडी दिली आहे.  तेथे ह्या हुंडीच्या जागी त्याला उज्जैनीवर ५०० ची दुसरी हुंडी करून घ्यावी लागेल.  येथे चिपळूणकरांना १ टक्का अशी ५ रु हुंडणावळ मिळाली आहे.  हुंडीची रक्कम आणि हुंडणावळ बाळकृष्ण आपाजीच्या नावे लिहिली आहे.  ह्या रकमेचा भरणा बाळकृष्ण आपाजी सवडीने करेल.

इंटरनेट बॅंकिंगच्या चालू जमान्यात अंतर्गत व्यापारासाठी हुंडीव्यवहार आता कालबाह्य झाले असले तरी हुंडीचे दुसरे भावंड, जे हवाला ह्या नावाने ओळखले जाते, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठया प्रमाणात चालू असावे.  ह्याचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे आखाती देशांमध्ये गेलेला भारतीय-पाकिस्तानी कामगारवर्ग आपल्या कुटुंबांकडे पैसे पाठविण्यासाठी बॅंकांकडे न जाता पुष्कळदा सहज ओळखीने उपलब्ध होणार्‍या ’हवाला’ ह्या खाजगी सेवेचा लाभ घेतात.  दुबईमधील भारतीय कामगार आपली परकीय चलनामधली कमाई तेथील एका हवाला एजंटाच्या हाती सोपवतो आणि बरोबर आपल्या कुटुंबीयाचा पत्ता, फोन नंबर इत्यादि.  एजंट फोनवरूनच आपल्या भारतातील सहकार्‍याला लगेच हे तपशील पुरवतो.  एवढ्यावर दुसर्‍याच दिवशी कुटुंबाच्या हातात रुपये येऊन पडतात. केवळ विश्वासावर चालणारी ही यंत्रणा एक्स्चेंज दर, कमिशन दर, लिखापढीचा अभाव, सेवेची तत्परता आणि गति अशा बाबतींत बॅंकांहून अधिक समाधानकारक सेवा देते आणि त्यामुळे विशेषत: खालचा वर्ग तिच्याकडे सहज आकर्षित होतो.

ह्याच मार्गाने गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा, कर चुकविलेला काळा पैसा, दहशतवादी चळवळींना पुरवला जाणारा पैसा तितक्याच सुकरतेने सीमापार जाऊ शकतो आणि देशोदेशींच्या आर्थिक देखरेख करणार्‍या संस्थांच्या नजरेबाहेर आपले काम करत राहतो.  ह्याच कारणासाठी इंटरपोलपासून देशोदेशींचे पोलिस त्याच्या मागावर असतात.

हुंडी व्यवहार कमी झाले पण हुंडीव्यवहारांनी मराठी भाषेला दिलेले काही शब्द आता भाषेचा अविभाज्य भाग झाले आहेत.  शहाजोगपणा करणे, शहानिशा करणे, लग्नाळू मुलीला चांगले स्थळ मिळवणे अशा अर्थाने हुंडी पटविणे, भलावण करणे हे शब्द असेच वापरात चालू राहणार!