Thursday, March 27, 2014

भोजनकुतूहल - १

शीर्षकात दाखविलेले स्वयंपाक ह्या विषयावरचे ’भोजनकुतूहल’ हे पुस्तक मला DLIच्या संस्थळावर दिसले. असले विषय संस्कृत लिखाणात क्वचितच दृष्टीस येतात म्हणून कुतूहलाने ’भोजनकुतूहल’ उतरवून घेतले आणि चाळले.  त्यातून वेचलेले काही वेधक उल्लेख येथे दाखवीत आहे.

पुस्तक ’रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिले असावे.  त्याची मजसमोरील आवृत्ति १९५६ साली (तत्कालीन) त्रावणकोर विद्यापीठाच्या विद्यमाने मुद्रित झाली आहे.  पुस्तकाचा लेखनकाल, त्याचा लेखक रघुनाथ आणि त्याच्या अन्य कृति ह्याविषयी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे ह्यांनी केलेल्या संशोधनाचा सारांश ह्या लेखाच्या अखेरीस लिहिला आहे.

वेगवेगळे खाण्याचे पदार्थ कसे कसे करावे, त्यांच्यामध्ये कायकाय घालावे असे जे मार्गदर्शन सध्याच्या पाककृति ह्या विषयांवरच्या पुस्तकांमध्ये असते तसे ह्या पुस्तकात फार थोडे आहे.  काही ठळकठळक प्रकार कसे बनवायचे असे मार्गदर्शन देऊन त्या प्रत्येक गोष्टीचे शरीरावर काय परिणाम होतात त्याचे आयुर्वेदाच्या अंगाने विवेचन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.  दिलेले प्रकारहि आजच्या पेक्षा काही फार वेगळे आहेत असे नाही.  तरीपण पुस्तक मनोरंजक वाटते ते अशासाठी की १७व्या शतकात लोक काय खात होते आणि काय खात नव्हते, कोणते अन्नघटक उपलब्ध होते आणि कोणते नव्हते ह्याचे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात उपयुक्त असे दर्शन ह्यातून होते.  काही काही कृति वापरातून अजिबात गेल्या आहेत, काही काही वेगळ्या नावांनी पुढे येतात तर काही काहींचे दर्शक शब्द आता विस्मरणात गेले आहेत असे लक्षात येते.

पुस्तकाची काही प्रमुख प्रकरणे अशी आहेत:

१) शूकधान्यप्रकरण. ह्यामध्ये शूकधान्ये - शालि (तांदूळ), गोधूम (गहू), यव (जव) आणि यावनाल (ज्वारी) - ह्यांचे प्रकार.  ’शूक’ म्हणजे कणीस.  ही धान्ये कणसांमधून मिळतात.  ( पुस्तकातील वर्गीकरण हे पारंपारिक आयुर्वेदिक असून लिनेअसच्या वनस्पतिवर्गीकरणाशी काही संबंध ठेवत नाही हे ध्यानात ठेवायला हवे.). ह्या प्रत्येक धान्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय गुणदोष आहेत त्यांचे वर्णन सुश्रुत, भावप्रकाश, राजनिघण्टु, वाग्भट अशा ग्रंथांमधील अवतरणांच्या आधारे दिलेले आहे.  ह्यापुढे वर्णिलेल्या अन्य गोष्टींबाबतहि असेच केले आहे.

शूकधान्यांपैकी शालि आणि यावनाल ह्यांच्या अनेक पोटजाती दर्शवून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात ह्याचेहि एकेका शब्दात दिग्दर्शन आहे.  ( लेखक रघुनाथ हा मराठीभाषिक होता.  ह्याच्याविषयी पुढे अधिक माहिती येईलच.) शालिविषयात वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली असे प्रकार पुढीलप्रमाणे -  राजशालि (महाराष्ट्रात रायभोग, आन्ध्रात राजान्न), कृष्णशालि (गोदातीर), रक्तशालि (तामसाळ?), स्थूलशालि अथवा महाशालि (कोळम, कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीमध्ये विख्यात), सूक्ष्मशालि, गन्धशालि किंवा प्रमोदक (कमोद), षाष्टिका (साठ दिवसात होणारी, मालव प्रान्तातील) आणि असेच आणखी काही.

यावनाल म्हणजे ज्वारी हिच्या उपप्रकारांमध्ये पांढरी (लटोरा, मोल्सवर्थने ह्याचा अर्थ अरगडी असा दिला आहे), तांबडी, शारद म्हणजे हिवाळ्यात होणारी (शाळू) आणि मका (मक्का, हा बालप्रिय असल्याचा उल्लेख आहे म्हणजे मक्याची कणसे भाजून खायचा उद्योग असणार) इतके प्रकार दर्शविले आहेत.  मका ज्वारीखाली टाकला आहे ह्याबाबत काही लिखाण नंतर येईल.  अखेरीस बाजरीचाहि अस्फुट उल्लेख ज्वारीखालीच केला आहे.  रघुनाथाने त्याला त्रोटकपणे ’सजगुरे’ असे म्हटले आहे आणि मोल्सवर्थप्रमाणे ह्याचा अर्थ ’बाजरी’ असा आहे.

२) शिम्बीधान्यप्रकरण - शेंगांमधून मिळणारी धान्ये.  ह्यामध्ये मुद्ग (मूग), मसूर, माष (उडीद), चणक (हरभरे), लंका (लाख) - एक गुलाबी डाळ, ही खाल्ल्याने लकवा होतो अशी समजूत आहे.  उत्तर भारतात हिचा वापर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधे अधिक होतो - तुवरी (तूर), कुलित्थ (कुळीथ), मकुष्ठ (मोठ म्हणजे मटकी), तिल (तीळ), सर्षप (मोहरी), निष्पाव (वाल?), अतसी (जवस), कलाय (मटार) इत्यादींचा समावेश आहे.  ’शेंग’ हा शब्द ’शिम्बी’चाच अपभ्रंश दिसतो. शेंबी असाहि शब्द मी ऐकला आहे आणि मोल्सवर्थ इ. कोशांमधून त्याचा अर्थ ’टोपण’ अशा अंगाने दिला आहे.  तोहि येथून निघाला असावा.

३) तृणधान्यप्रकरण - ह्यामध्ये प्रियंगु (राळे), कोद्रव (हरीक), वरक (वरई), श्यामाक (सावे) अशी काही गवताच्या बियांसारखी असणारी धान्ये दिली आहेत.

४) चौथ्या प्रकरणात धान्यांपासून काही प्रक्रियेने होणार्‍या वस्तु, म्हणजे भाजून केलेल्या लाजा (लाह्या), कुटून केलेले पृथुक (पोहे), अर्धपक्व धान्ये गवतावर भाजून होलक (हुरडा), धान्य भिजवून केलेले कुल्माष (घुगर्‍या), यन्त्रपिष्ट (जात्यामध्ये धान्य भरडून केलेले) सक्तु (सत्त्व), भाजलेले चणे (फुटाणे), मिठाचे पाणी शिंपडून भाजलेले (मिठाणे), तेच तेलात तळलेले (उसळे) अशा गोष्टी आहेत.

अशा ह्या सर्व प्रकारच्या धान्यांचे उल्लेख भारतीय प्राचीन वाङ्मयात अनेकदा मिळतात.  यजुर्वेदान्तर्गत अशा प्रसिद्ध रुद्रसूक्तात सूक्तकार रुद्रांकडून ज्या ज्या अनेक गोष्टींची प्रार्थना करतो त्यांमध्ये ’व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे’ अशाहि मागण्या आहेत.

५) ग्रन्थकर्ता ह्यापुढे शिजवलेल्या अन्नाकडे वळतो.  येथे नाना प्रकारचे भात, खिरी, पोळ्या, सूप म्हणजे आमटी, क्वथिका म्हणजे कढी, वटक (वडे), शिखरिणी, जिलबी, शंखपाल (शंकरपाळे), मांसाचे प्रकार, मद्य इत्यादींची वर्णने आहेत.  ह्या मनोरंजक विषयांकडे आणि उर्वरित ग्रंथाकडे पुढील भागामध्ये पाहू.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.  ग्रंथातील सर्वात अधिक तिखट गोष्ट म्हणजे मरीच किंवा मिरी.  तिचे उल्लेख मुबलक आहेत.  आर्द्रक म्हणजे आलेहि ह्या संदर्भात अनेकदा दिसते पण मिरची कोठेच नाही.  ह्याचे कारण असे की स्पॅनिश विजेत्यांना ह्या दक्षिण अमेरिकेतील मूळच्या गोष्टी तेथे माहीत होऊन त्या युरोपात पोहोचायला १५व्या शतकाची अखेर आली आणि तेथून त्या पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतकारांबरोबर आफ्रिका-आशियात पसरल्या.  रघुनाथाने प्रस्तुत ग्रंथ लिहीपर्यंत त्या दक्षिण भारतात पुरेशा प्रसार पावलेल्या नसाव्यात.  अपवाद दोन गोष्टींचा - मक्याचा उल्लेख यावनाल (ज्वारी) प्रकारात आला आहे हे वर उल्लेखिलेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.  काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते.  नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय?  असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही.  परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?)

Thursday, March 13, 2014

श्लोकचतुष्टयम्

"काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
तत्रापि च चतुर्थोऽङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्॥"
(काव्यप्रकारांमध्ये ’नाटक’ हा प्रकार रमणीय, नाटकांमध्ये ’शाकुन्तल’, शाकुन्तलामध्ये त्याचा चौथा अंक आणि त्या अंकामध्ये ’चार श्लोक’.)

हा श्लोक ऐकून पुष्कळांना माहीत असतो.  ह्यामध्ये उल्लेखिलेले चार श्लोक म्हणजे निश्चित कोणते असा प्रश्न मला जाणवला.  तो मी तज्ज्ञांना विचारला असता चार निरनिराळी मते समोर आली.  त्यांचे हे संकलन.

पहिले मत असे सांगते की दाक्षिणात्य विचारानुसार हे श्लोक क्र. ६,९,१७,१८ असे आहेत.  ते खालीलप्रमाणे:
क्र. ६
यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठया
कण्ठस्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम्।
वैक्लव्यं मम तावदीदृशमहो स्नेहादरण्यौकसः
पीडयन्ते गृहिणः कथं नु तनयाविश्लेषदुःखैर्नवैः॥

(पिता काश्यपमुनि म्हणतात) आज शकुन्तला जाणार ह्या विचाराने माझे हृदय सैरभैर झाले आहे, अश्रु थांबवलेला माझा गळा भरून आला आहे, अरण्यात निवास करणार्‍या माझी जर प्रेमामुळे अशी विक्लव स्थिति झाली आहे तर सामान्य गृहस्थ कन्याविरहाच्या दु:खाने किती व्यथित होत असतील?

क्र. ९
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या
नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्।
आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः
सेयं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्॥

(काश्यपमुनि अरण्यातील वृक्षांना उद्देशून) तुम्हाला पाणी दिल्याशिवाय जी स्वत: पाणी पिऊ शकत नाही, आभूषणे धारण करण्याची हौस असतांनाहि तुमच्यावरील स्नेहामुळे जी तुमचे पान तोडत नाही, तुम्ही फुलांनी फुलण्याच्या प्रसंगाआधीच जिचा उत्सव सुरू होतो, अशी ही शकुन्तला पतिगृही जायला निघते आहे.  तिला सर्वांनी त्यासाठी सम्मति द्यावी.

क्र. १७
अस्मान् साधु विचिन्त्य संयमधनानुच्चैः कुलं चात्मन
स्त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम्।
सामान्यप्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु दृश्या त्वया
भाग्यायत्तमतःपरं न खलु तद्वाच्यं वधूबन्धुभिः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेच्या सोबतीला निघालेल्या आपल्या शार्ङ्गरवनामक शिष्याबरोबर दुष्यन्ताला संदेश देतात) संयम हेच धन मानणार्‍या आमचा आणि स्वत:च्या उच्च कुलाचा विचार मनात ठेवून, तसेच आम्हा बान्धवांच्या साहाय्याशिवाय तुझ्या मनात हिच्याविषयी जी प्रेमभावना निर्माण झाली ती ध्यानात ठेवून आपल्या अन्य पत्नींसारख्याच समान स्थानाची ही एक असे तू हिच्याकडे पहावेस.  ह्या पलीकडील सर्व भविष्याच्या आधीन आहे, वधूच्या संबंधितांनी ते बोलावयाचे नसते.

क्र. १८
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी आदरपूर्वक वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस.  असे करणार्‍या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणार्‍या कुटुंबाला खाली नेतात.

दुसर्‍या मतानुसार भाषान्तरकार एम. आर. काळे हेच श्लोक क्र. ६, १८, १९, २० असे सांगतात. पैकी क्र. ६ आणि १८ वर दिले आहेत.  उरलेले दोन असे:

क्र. १९
अभिजनवतो भर्तुः श्लाघ्ये स्थिता गृहिणीपदे
विभवगुरुभिः कृत्यैस्तस्य प्रतिक्षणमाकुला ।
तनयमचिरात् प्राचीवार्कं प्रसूय च पावनं
मम विरहजां न त्वम् वत्से शुचं गणयिष्यसि ॥

बाळे, उच्चकुलीन पतीच्या श्लाघ्य अशा गृहिणीपदी पोहोचलेली आणि त्याच्या स्थानाला साजेशा अशा त्याच्या कार्यांमध्ये सदैव गुंतलेली अशी तू पूर्व दिशेने सूर्याला जन्म द्यावा तसा लवकरच पुत्राला जन्म दिल्यानंतर मजपासून दूर गेल्याच्या दु:खाला मागे टाकशील.

क्र. २०
भूत्वा चिराय चतुरन्तमहीसपत्नी
दौष्यन्तिमप्रतिरथं तनयं निवेश्य।
भर्त्रा तदर्पितकुटुंबभरेण साकं
शान्ते करिष्यसि पदं पुनराश्रमेऽस्मिन्॥

(मी पुन: ह्या तपोवनात केव्हा येईन असे शकुन्तलेने विचारल्यावर काश्यपमुनि उत्तर देतात) दिगन्तापर्यंतच्या पृथ्वीची सपत्नी म्हणून दीर्घ काळ गेल्यावर, ज्याच्यासमोर दुसरा रथी उभा राहू शकत नाही अशा दुष्यन्तपुत्राचा विवाह करून दिल्यानंतर आणि सर्व कुलभार त्याच्यावर सोपविल्यानंतर ह्या शान्त अशा आश्रमात पतीसह तू पुन: परतशील.

तिसरे मत ’शतावधान’ नावाच्या टीकाकाराच्या हवाल्याने असे सांगते की हे श्लोक क्र. १७, १८, १९, २० असे आहेत.  ह्यांची भाषान्तरे वर दिलीच आहेत.

शेवटच्या मतानुसार हे श्लोक क्र. ६,९,१०,११ असे आहेत.  त्यापैकी क्र. ६ आणि ९ वर दिलेच आहेत.  उरलेले दोन श्लोक असे:

क्र. १०
अनुमतगमना शकुन्तला तरुभिरीयं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

(वरील श्लोकापाठोपाठ कानी पडलेला कोकिळेचा सूर ऐकून काश्यपमुनि अरण्यानिवासातील बंधु असे जे वृक्ष त्यांनी शकुन्तलेच्या गमनाला मधुर कोकिलगानाच्या प्रतिवचनाने अनुमति दर्शविली आहे.

क्र. ११
रम्यान्तर: कमलिनीहरितै: सरोभि-
श्छायाद्रुमैर्नियमितार्कमयूखताप:।
भूयात्कुशेशयरजोमृदुरेणुरस्या:
शान्तानुकूलपवनश्च शिवश्च पन्था:॥

(आकाशवाणी)  कमलवेलींमुळे हिरव्या दिसणार्‍या सरोवरांनी रमणीय केलेला, दाट सावल्यांच्या वृक्षांमुळे सूर्यकिरणांचा ताव नियंत्रित झालेला, ज्यातील धूळ कमळाच्या केसरांप्रमाणे मृदु आहे असा, जेथील वारा शान्त आणि अनुकूल आहे असा हिचा मार्ग मंगल होवो.