Thursday, March 13, 2014

श्लोकचतुष्टयम्

"काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
तत्रापि च चतुर्थोऽङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्॥"
(काव्यप्रकारांमध्ये ’नाटक’ हा प्रकार रमणीय, नाटकांमध्ये ’शाकुन्तल’, शाकुन्तलामध्ये त्याचा चौथा अंक आणि त्या अंकामध्ये ’चार श्लोक’.)

हा श्लोक ऐकून पुष्कळांना माहीत असतो.  ह्यामध्ये उल्लेखिलेले चार श्लोक म्हणजे निश्चित कोणते असा प्रश्न मला जाणवला.  तो मी तज्ज्ञांना विचारला असता चार निरनिराळी मते समोर आली.  त्यांचे हे संकलन.

पहिले मत असे सांगते की दाक्षिणात्य विचारानुसार हे श्लोक क्र. ६,९,१७,१८ असे आहेत.  ते खालीलप्रमाणे:
क्र. ६
यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठया
कण्ठस्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम्।
वैक्लव्यं मम तावदीदृशमहो स्नेहादरण्यौकसः
पीडयन्ते गृहिणः कथं नु तनयाविश्लेषदुःखैर्नवैः॥

(पिता काश्यपमुनि म्हणतात) आज शकुन्तला जाणार ह्या विचाराने माझे हृदय सैरभैर झाले आहे, अश्रु थांबवलेला माझा गळा भरून आला आहे, अरण्यात निवास करणार्‍या माझी जर प्रेमामुळे अशी विक्लव स्थिति झाली आहे तर सामान्य गृहस्थ कन्याविरहाच्या दु:खाने किती व्यथित होत असतील?

क्र. ९
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या
नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्।
आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः
सेयं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्॥

(काश्यपमुनि अरण्यातील वृक्षांना उद्देशून) तुम्हाला पाणी दिल्याशिवाय जी स्वत: पाणी पिऊ शकत नाही, आभूषणे धारण करण्याची हौस असतांनाहि तुमच्यावरील स्नेहामुळे जी तुमचे पान तोडत नाही, तुम्ही फुलांनी फुलण्याच्या प्रसंगाआधीच जिचा उत्सव सुरू होतो, अशी ही शकुन्तला पतिगृही जायला निघते आहे.  तिला सर्वांनी त्यासाठी सम्मति द्यावी.

क्र. १७
अस्मान् साधु विचिन्त्य संयमधनानुच्चैः कुलं चात्मन
स्त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम्।
सामान्यप्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु दृश्या त्वया
भाग्यायत्तमतःपरं न खलु तद्वाच्यं वधूबन्धुभिः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेच्या सोबतीला निघालेल्या आपल्या शार्ङ्गरवनामक शिष्याबरोबर दुष्यन्ताला संदेश देतात) संयम हेच धन मानणार्‍या आमचा आणि स्वत:च्या उच्च कुलाचा विचार मनात ठेवून, तसेच आम्हा बान्धवांच्या साहाय्याशिवाय तुझ्या मनात हिच्याविषयी जी प्रेमभावना निर्माण झाली ती ध्यानात ठेवून आपल्या अन्य पत्नींसारख्याच समान स्थानाची ही एक असे तू हिच्याकडे पहावेस.  ह्या पलीकडील सर्व भविष्याच्या आधीन आहे, वधूच्या संबंधितांनी ते बोलावयाचे नसते.

क्र. १८
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी आदरपूर्वक वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस.  असे करणार्‍या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणार्‍या कुटुंबाला खाली नेतात.

दुसर्‍या मतानुसार भाषान्तरकार एम. आर. काळे हेच श्लोक क्र. ६, १८, १९, २० असे सांगतात. पैकी क्र. ६ आणि १८ वर दिले आहेत.  उरलेले दोन असे:

क्र. १९
अभिजनवतो भर्तुः श्लाघ्ये स्थिता गृहिणीपदे
विभवगुरुभिः कृत्यैस्तस्य प्रतिक्षणमाकुला ।
तनयमचिरात् प्राचीवार्कं प्रसूय च पावनं
मम विरहजां न त्वम् वत्से शुचं गणयिष्यसि ॥

बाळे, उच्चकुलीन पतीच्या श्लाघ्य अशा गृहिणीपदी पोहोचलेली आणि त्याच्या स्थानाला साजेशा अशा त्याच्या कार्यांमध्ये सदैव गुंतलेली अशी तू पूर्व दिशेने सूर्याला जन्म द्यावा तसा लवकरच पुत्राला जन्म दिल्यानंतर मजपासून दूर गेल्याच्या दु:खाला मागे टाकशील.

क्र. २०
भूत्वा चिराय चतुरन्तमहीसपत्नी
दौष्यन्तिमप्रतिरथं तनयं निवेश्य।
भर्त्रा तदर्पितकुटुंबभरेण साकं
शान्ते करिष्यसि पदं पुनराश्रमेऽस्मिन्॥

(मी पुन: ह्या तपोवनात केव्हा येईन असे शकुन्तलेने विचारल्यावर काश्यपमुनि उत्तर देतात) दिगन्तापर्यंतच्या पृथ्वीची सपत्नी म्हणून दीर्घ काळ गेल्यावर, ज्याच्यासमोर दुसरा रथी उभा राहू शकत नाही अशा दुष्यन्तपुत्राचा विवाह करून दिल्यानंतर आणि सर्व कुलभार त्याच्यावर सोपविल्यानंतर ह्या शान्त अशा आश्रमात पतीसह तू पुन: परतशील.

तिसरे मत ’शतावधान’ नावाच्या टीकाकाराच्या हवाल्याने असे सांगते की हे श्लोक क्र. १७, १८, १९, २० असे आहेत.  ह्यांची भाषान्तरे वर दिलीच आहेत.

शेवटच्या मतानुसार हे श्लोक क्र. ६,९,१०,११ असे आहेत.  त्यापैकी क्र. ६ आणि ९ वर दिलेच आहेत.  उरलेले दोन श्लोक असे:

क्र. १०
अनुमतगमना शकुन्तला तरुभिरीयं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

(वरील श्लोकापाठोपाठ कानी पडलेला कोकिळेचा सूर ऐकून काश्यपमुनि अरण्यानिवासातील बंधु असे जे वृक्ष त्यांनी शकुन्तलेच्या गमनाला मधुर कोकिलगानाच्या प्रतिवचनाने अनुमति दर्शविली आहे.

क्र. ११
रम्यान्तर: कमलिनीहरितै: सरोभि-
श्छायाद्रुमैर्नियमितार्कमयूखताप:।
भूयात्कुशेशयरजोमृदुरेणुरस्या:
शान्तानुकूलपवनश्च शिवश्च पन्था:॥

(आकाशवाणी)  कमलवेलींमुळे हिरव्या दिसणार्‍या सरोवरांनी रमणीय केलेला, दाट सावल्यांच्या वृक्षांमुळे सूर्यकिरणांचा ताव नियंत्रित झालेला, ज्यातील धूळ कमळाच्या केसरांप्रमाणे मृदु आहे असा, जेथील वारा शान्त आणि अनुकूल आहे असा हिचा मार्ग मंगल होवो.

No comments:

Post a Comment