Tuesday, October 2, 2012


सातारा जिल्ह्यातील ’देवराष्ट्रे’ गावाबाबत काही...


’देवराष्ट्रे’ हे सातारा जिल्ह्यातल्या छोटया गावाचे नाव तसे परिचित होते.  यशवंतराव चव्हाणांचे तसेच रमाबाई रानडे ह्यांचे हे जन्मगाव.  गावाच्या नावाबाबत जरा कुतूहल होते कारण इतके जवळजवळ संस्कृत भाषेतील वाटावे असे नाव महाराष्ट्रात तरी दुर्मिळ वाटते.  ह्या गावच्या जुनेपणाविषयीहि कोठे काही ऐकलेले वा वाचलेले नव्हते.

कालपरवा असे ध्यानात आले की अलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या स्तंभावर जो समुद्रगुप्ताचा म्हणून दीर्घ कोरीव लेख आहे त्यात ’देवराष्ट्र’ नावाच्या नगराचा आणि तेथील ’कुबेर’नामक राजाचा उल्लेख आहे.  लेखाच्या १९व्या आणि २०व्या ओळीत समुद्रगुप्ताच्या दक्षिणेतील मांडलिक राजांची नावे आहेत.  ती अशी: 

कोसलमहेन्द्र-महाकान्तारकव्याघ्रराज-कैरालकमण्टराज-पैष्टपुरकमहेन्द्र-गिरिकौटूरकस्वामिदत्तै-रंडपल्लकदमन-काञ्चेयकविष्णुगोपा-वसमुक्तकनीलराज-वैङ्गेयकहस्तिवर्म-पालक्कोग्रसेन-दैवराष्ट्रकुबेर-कौस्थलपुरकदनञ्जय-प्रभृतिसर्वदक्षिणापथग्रहणमोक्षानुग्रहजनितप्रतापोन्मिश्रमहाभाग्यस्य...
(कोसलाचा महेन्द्र, महाकान्ताराचा व्याघ्रराज, केरलाचा  मण्टराज, पिष्टपुराचा महेन्द्र, गिरिकौटूराचा स्वामिदत्त, एरंडपल्लकाचा दमन, कांचीचा विष्णुगोप, अवसमुक्ताचा नीलराज, वेंगीचा हस्तिवर्मन्, पलक्काचा उग्रसेन, देवराष्ट्राचा कुबेर, कुस्थलपुराचा धनंजय, दक्षिणापथातील ह्या राजांना जिंकण्याच्या आणि पुन:प्रस्थापित करण्याच्या प्रतापामुळे ज्या (समुद्रगुप्ताला) मोठे भाग्य प्राप्त झाले...) (Corpus Inscriptionum Indicarum: Vol. III. पृ. १०-१७).

जालावर अधिक शोध घेता असे दिसले की देवराष्ट्रे गावात बरीच प्राचीन देवालये आहेत.  तेथील सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर हे शंकराचे देऊळ विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याच नावाने गावाजवळ एक अभयारण्य निर्माण करण्यात आले आहे.  महाराष्ट्र गॅज़ेटीअर विभागाच्या ह्या स्थळावर गावातील देवळांची आणि जवळच्या लेण्यांची बरीच माहिती आहे.  महाभारताशी जोडलेली समुद्रेश्वराच्या बांधणीची कथाहि तेथे वाचावयास मिळते.

बराच शोध घेतल्यावर http://www.marathimati.net/seva/photogallery/sagareshwar-temple-photos येथे मला सागरेश्वर नावाच्या देवळाचे फोटो मिळाले पण देवराष्ट्रेमधील सागरेश्वर हेच का ते मी सांगू शकत नाही कारण वेंगुर्ल्याजवळहि ह्याच नावाचे देऊळ आहे.  फोटोतील देऊळ आसपासच्या वातावरणावरून कोकणातील आहे असे वाटत नाही इतके नमूद करतो.

हे सर्व पाहून मला अशी शंका येत आहे की दक्षिणापथातील समुद्रगुप्ताने मांडलिक केलेला कुबेर आणि त्याचे देवराष्ट्र नगर हे आजचे देवराष्ट्रे असू शकेल काय? तसेच समुद्रेश्वर हे देवळाचे नावहि कुबेरानेच आपला सम्राट् समुद्रगुप्त ह्याच्या नावावरून दिले असावे. अन्यथा समुद्र किनार्‍यापासून बरेच दूर सह्याद्रीच्या रांगेच्या पूर्वेस असणार्‍या ह्या गावात समुद्राच्या नावाचे देऊळ असण्याचे कारण काय?

जालावर अथवा अन्य कोठेच मला असे कोणी म्हटलेले दिसत नाही पण त्याचे कारण सहजच सुचते.  गुप्त राजांच्या अनेक कोरीव लेखांपैकी एकामध्ये कोठेतरी मधोमध हे नाव दडलेले.  देवराष्ट्रे गावहि आज छोटे खेडेच आहे आणि यशवंतरावांचा तेथे जन्म झाला नसता तर अन्य शेकडो-हजारो खेड्यांप्रमाणे तेहि दुर्लक्षितच राहिले असते.  त्यामुळे सर्व भारतभर पसरलेल्या जुन्या लेखांच्या अभ्यासकांमध्ये अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या लेखात हे नाव दिसताच डोक्यात टयूब पेटावी आणि हा सांधा जोडला जावा असे काहीच कारण नाही.

कोणा अन्य जाणकाराला ह्याविषयी काही अधिक माहिती असल्यास ती जाणून घेण्याची इच्छा आहे.


No comments:

Post a Comment