Wednesday, November 20, 2013

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग २

१९) क्लब रोड - जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), आनंदराव नायर मार्ग (लॅमिंग्टन रोड), मोहम्मद शहीद मार्ग (मोरलॅंड रोड) आणि मराठा मंदिर मार्ग (क्लब रोड) अशा चौकोनामध्ये सध्या मराठा मंदिर सिनेमा, रिजर्व बॅंक कॉलनी, एसटी आणि बेस्टचे बसडेपो आहेत तो चौकोन १९४७ सालापर्यंत भायखळा क्लबाने व्यापलेला होता.  १८३३ साली सुरू झालेला आणि केवळ युरोपीयनांसाठीचा हा क्लब मुंबईतील तशा सर्व अन्य क्लबांमध्ये सर्वांत exclusive  मानला जाई आणि त्याचे सदस्यत्व मिळवणे सर्वसामान्य युरोपीयनांनाहि अवघड होते.  त्याच्या नावावरून क्लब रोड हे नाव पडलेले आहे.  हे apertheid स्वातन्त्र्यानंतर टिकवणे अवघड जाईल ह्या विचाराने १९४७ साली तो विसर्जित करण्यात येऊन त्याची मालमत्ता विकण्यात आली.  १८८३ मध्ये टर्फ क्लब ची स्थापना होईपर्यंत घोडयांच्या शर्यती भायखळा क्लबच्या विस्तीर्ण मैदानावर होत असत.  ’भायखळा क्लब कप’ मुळे टर्फ क्लबमध्ये ह्याची आठवण अजून जागी आहे.  क्लब रोड आणि भायखळा क्लबची खालील चित्रे पहा:



२०) चिरा बझार - एके काळी गिरगाव रस्त्याचा हा भाग दगडी चिरे वापरून झाकलेला असल्याने हे नाव त्याला मिळाले.

२१) चर्नी रोड - शेपर्ड ह्यांनी ह्या रस्त्याच्या नावाचे स्पेलिंग Charni Road असे दाखविले आहे.  त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की हे कोणा साहेबाचे नाव नसून ह्याचा उगम देशीच दिसतो.  ह्या उगमाबाबत सार्वत्रिक समजूत अशी दिसते की गुरेचारणीची जागा म्हणून हे नाव जागेला पडले. हे सहज शक्य वाटले तरी ह्यास आधार कोठेच दिसत नाही.  मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब.पु.बा.जोशी हे म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले.  चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

२२) कुलाबा, Old Woman's Island, कुलाबा कॉजवे, अफगाण चर्च - शेजारी दाखविलेल्या मुंबईखालील मूळच्या
सात बेटांच्या नकाशात अगदी खाली कुलाबा आणि Old Woman's Island अशी दोन बेटे आहेत.  पैकी Old Woman's Island हे छोटे बेट आता उरलेलेच नाही कारण कुलाब्याला मुख्य मुंबईशी जोडणार्‍या कुलाबा कॉजवेने त्याला गिळून टाकलेले आहे.

Old Woman's Island ह्या नावाचा उगम कोठेच सापडत नाही पण कुलाबा ह्याचा उगम ’कोळ-भाट’ (कोळी लोकांची जागा) असा असावा असा तर्क गर्सन दा कुन्हा आणि एडवर्ड्स् ह्यांनी केला आहे.  मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये ह्या शब्दाचे मूळ अरबी असल्याचे दर्शवून त्याचा अरबी अर्थ ’समुद्रात शिरलेला जमिनीचा लांब तुकडा’ असा दाखविला आहे.  (कोकण किनार्‍यावरील कुलाबा गाव आणि मुंबईतील बेट ह्या दोहोंचा हा अर्थ मोल्सवर्थमध्ये दाखविला आहे.) एडवर्ड्स ह्यांच्या मते Old Woman's Island हे नावहि Island of Al-Omanis - Island of Deep-sea Fishermen अशा अर्थाच्या अरबी शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश आहे.

१७९६ सालामध्ये कुलाब्याचे बेट हा कॅंटोन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आला.  (अजूनहि कुलाब्याचा मोठा भाग सैन्यदलाच्या ताब्यात आहे त्याचा हा उगम.) मात्र तेथे जायला होडीचा वापर करावा लागत असे.  १८३८ मध्ये मधल्या Old Woman's Island चा पायरीसारखा उपयोग करून कॉजवेच्या मार्गाने कुलाबा मुख्य मुंबईशी जोडले गेले.

कुलाब्यात असलेले आणि १८४६ साली बांधलेले the Church of St John the Evangelist' हे ’अफगाण चर्च’ ह्या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. चर्चमधील एका स्मृतिलेखाप्रमाणे हे चर्च १८३८ च्या पहिल्या अफगाण युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृतीला वाहिलेले आहे.
(संगमरवरी लेख)

२३) कॉटन ग्रीन - १९व्या शतकाच्या प्रारंभापासून पूर्वेला चीनकडे आणि पश्चिमेला इंग्लंड आणि युरोपकडे कपाशीची निर्यात हा मुंबईतील एक प्रमुख व्यवसाय झाला होता.  दक्षिण हिंदुस्तानात उत्पादन झालेली कपात निर्यातीसाठी मुंबईत जमा होई आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत तिला टाउन हॉलसमोरच्या मोकळ्या जागेत साठवत असत. हे पहिले ’कॉटन ग्रीन’. कॉजवेमुळे कुलाबा मुंबईस जोडला गेल्यानंतर आणि १८६७ साली बीबीसीआय रेल्वेने कुलाबा स्टेशन बांधल्यावर मुंबईत येणारी कपास साठवणीची नवे ’कॉटन ग्रीन’ ह्या स्टेशनाजवळ आणण्यात आले.  तेथे ते १९३० सालाच्या पुढेमागेपर्यंत होते.  रेल्वेने कुलाबा स्टेशन १९३० सालात बंद केले.  तदनंतर कापसाचा व्यापार तेथून हलून उत्तरेस हार्बर लाईनवरील ’कॉटन ग्रीन’ नावाच्या नव्या स्टेशनाच्या परिसरात आणि ’कॉटन ए़क्स्चेंज’ ह्या नव्या इमारतीजवळ गेला.  आता काळ अजून पुढे सरकला आहे आणि ह्या अलीकडच्या ’कॉटन ग्रीन’मध्ये आयातनिर्यात मुख्यत्वेकरून लोखंड आणि पोलादाची होत असते.  कुलाब्याचे कॉटन ग्रीन असे दिसत असे:


२४) कूपरेज - ’कूपर’ हे एका व्यवसायाचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.  कूपर हा व्यावसायिक लाकडापासून वस्तु आणि द्रव ठेवण्याची भांडी - बॅरल, बादली इत्यादि तयार करतो.  सैन्यासाठी लागणारे मासे, मांस ह्यासारखे खाद्यपदार्थ, बीअरसारखी पेये टिकून राहण्य़ासाठी ते मिठात खारवणे, वाळवणे आणि नंतर योग्य प्रकारच्या लाकडाच्या भांडयात साठवणे ही कामे कूपर्स करीत आणि ह्यासाठीची जागा किल्ल्याच्या आत होती.  कालान्तराने नाना प्रकारचे वास आणि दुर्गन्धि निर्माण करणारे हे काम किल्ल्याबाहेर करण्यासाठी बेटाच्या दक्षिण बाजूस अपोलो बंदराजवळ एक शेड बांधून कूपर व्यावसायिकांची तिकडे रवानगी झाली.  १७८१ साली बांधलेली ही शेड १८८६ पर्यंत त्या कामासाठी वापरात होती.  त्या शेडच्या मोकळ्या जागेला कूपरेज हे नाव लागले आहे.  शेजारच्या रस्त्यासहि तेच नाव मिळाले आहे.

२५) सी.पी.टँक रोड - फॉकलंड रोड (पठ्ठे बापूराव मार्ग), अर्स्किन रोड (ब्रि.उस्मान मार्ग) आणि किका स्ट्रीट हे जेथे मिळतात तेथून सुरू होणार्‍या ह्या रस्त्याला कावसजी पटेल ह्यांनी बांधलेल्या तलावावरून हे नाव पडले आहे.  पारशी समजुतीनुसार मुंबईत येणारी पहिली पारशी व्यक्ति इंग्रजांपूर्वी पोर्तुगीज काळातच १६४० साली आली होती.  त्या व्यक्तीचे नाव दोराबजी नानाभाई.  पोर्तुगीज अधिकारी आणि स्थानिक कोळी वस्ती ह्यांच्यामधील दुवा असे काम ते करीत असत आणि मुंबई इंग्रज अमलाखाली गेल्यावरहि त्यांची ती जागा चालू राहिली.  दोराबजीचा मुलगा रुस्तुम ह्याने १६९२ मध्ये सिद्दीचे मुंबईवरील आक्रमण स्थानिक कोळी लोकांची सेना उभारून परतवून लावले आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईचे पाटिलकीचे वतन वंशपरंपरा देण्यात आले.  रुस्तुमचा मुलगा कावसजी पटेल ह्याने धर्मार्थ हेतूने जो तलाव १७८० साली बांधला त्यावरून कावसजी पटेल टॅंक रोड तेव्हापासून ओळखला जातो.  विहार आणि तुळशी तलावांचे पाणी मुंबईत पोहोचल्यावर आरोग्याच्या कारणासाठी मुंबईतील इतर बहुतेक तलावांप्रमाणे हाहि बुजवला गेला.  बुजवण्याचे निश्चित वर्ष उपलब्ध नाही.  खाली दर्शविलेल्या जुन्या नकाशात कावसजी पटेल टॅंक रस्ता आणि त्याच्या पश्चिम टोकाला त्याच नावाचा तलाव दिसत आहे.

२६) क्रॉस आणि एस्प्लनेड मैदाने - मुंबईची बेटे कंपनीच्या ताब्यात १६६८ साली आली तेव्हा सध्याची दक्षिण मुंबई स्थानिक लोकांच्या शेतांनी आणि नारळाच्या वाडयांनी भरलेली होती.  हे लोक बहुसंख्येने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले होते.  सध्याचे मरीन लाइन्स, मेट्रो सिनेमा, एल्फिन्स्टन कॉलेजसारखे भाग ’कवेल’ नावाच्या वस्तीने व्यापलेले होते.  (कवेल हा शब्द कोळीवाडा ह्याचे पोर्तुगीज रूप आहे.)  कंपनीच्या ताब्यात ही बेटे आल्यावर परकी आक्रमणापासून त्यांचा बचाव करण्यासाठी इंग्रजांनी तेथे समुद्राकडे तोंड करून असलेला किल्ला बांधला आणि त्याच्या पश्चिम बाजूस मजबूत भिंत, बुरूज, तोफा ठेवण्याच्या जागा इत्यादि बांधून ती बाजू बळकट केली.  ह्यातूनच १७६० च्या सुमारास इंग्रज वरिष्ठांना असे वाटले पश्चिमेकडील कवेल, त्यातील घरे आणि वाडया, त्यातील मजबूत दगडविटांच्या बांधणीचे चर्च (Nossa Senhora da Esperança, Our Lady of Hope) आणि त्याला संलग्न दफनभूमि ह्यांपासून किल्ल्याला धोका संभवू शकतो कारण कोणी शत्रूने त्या बाजूने बेटावर सैन्य उतरविले तर ते सैन्य ह्या सर्व वाडया आणि बांधकामांच्या आडोशाने किल्ल्यावर हल्ला करू शकेल.  परिणामत: कवेल गाव उठवून चर्च जमीनदोस्त करण्यात आले.  (ह्याच कारणासाठी तेथेच जवळ असलेले मुंबादेवीचे देऊळ उठवून त्याच्या सध्याच्या जागी बदलण्यात आले. चर्चला भुलेश्वरकडे नवीन जागा देण्यात आली.) अशा रीतीने किल्ल्याच्या पश्चिमेस एक मोठे मैदान निर्माण झाले.  नदी, समुद्र, तलाव अशांना लागून असलेल्या जागेस ’एस्प्लनेड’ म्हणतात म्हणून हे मैदान त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.  कालान्तराने एस्प्लनेड मैदानामधून उत्तर-दक्षिण असा रस्ता निघून त्याला ’एस्प्लनेड रोड’ असे नाव मिळाले.  पुढील काळात हा भाग श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा संध्याकाळी फेरफटका मारण्याचा भाग झाला, तसेच त्याच्या उत्तर बाजूकडे सैन्याच्या कवायतींची जागा होती.  ह्या सर्वाचे  सुंदर वर्णन दिनशा वाच्छा ह्यांनी केले आहे.  त्यांच्याच सांगण्यानुसार १८५७ मध्ये मुंबईत नेटिव सैन्यात धनत्रयोदशीच्या रात्री काही बंडाची हालचाल आहे असे कानावर येताच पोलिस कमिशनर फोर्जेट ह्यांनी तातडीने तपास करून कारस्थानाच्या दोन पुढार्‍यांना  ताब्यात घेतले आणि झटपट कोर्ट मार्शल भरवून त्यांना मृत्युदंड सुनावला.  नोवेंबरच्या एका दुपारी दोघा पुढार्‍यांना सैन्याच्या आणि रहिवाशांच्या उपस्थितीत तोफांच्या तोंडी बांधून उडवून देण्यात आले.  वाच्छा तेव्हा जवळच्याच एल्फिन्स्टन स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी शाळेतून घरी परतत असतांना हा प्रसंग पाहिला.

१७६०च्या आगेमागे निर्माण झालेले हे मैदान अजूनहि गजबजलेल्या दक्षिण मुंबईत आपले मोकळेपण टिकवून धरण्यात पुष्कळ प्रमाणात यशस्वी झाले आहे.  त्याच्या मध्यातून जाणार्‍या दक्षिणोत्तर अशा एस्प्लनेड रोडमुळे ह्या मैदानाचे दोन भाग झाले आहेत.  पैकी पूर्वेकडील भागास आझाद मैदान असे नाव अलीकडे मिळाले आहे.  पश्चिमेकडील भागास ’क्रॉस मैदान’ म्हणतात कारण जुन्या पोर्तुगीज चर्च आणि दफनभूमीचा अवशेष असा एक क्रॉस तेथे टिकून होता. दिनशा वाच्छा आणि दा कुन्हा ह्या दोघांनीहि हा मूळचा क्रॉस पाहिल्याची नोंद ते करतात.  १९४०-४५ पर्यंत तो तेथे असावा कारण दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी मुंबईत उतरून युद्धाकडे रवाना होणार्‍या इंग्लिश-अमेरिकन सैनिकांना मुंबईची तोंडओळख करून देण्यासाठी छापलेल्या एका पुस्तिकेत त्याचा उल्लेख मला आढळला.  सध्याहि ह्या मैदानात एक क्रॉस दिसतो पण तो अलीकडेच बांधण्यात आला आहे.

एस्प्लनेड रोडचे नाव नंतर बदलून ’महात्मा गांधी रोड’ असे झाले.  हे नामान्तर स्वातन्त्र्यापूर्वीच केव्हातरी झालेले दिसते कारण वर उल्लेखिलेल्या पुस्तकात त्याचा तसा उल्लेख आहे आणि त्यातील नकाशातहि हे नाव दाखविले आहे.  ब्रिटिशांनी देश सोडण्यापूर्वीच हा बदल कसा घडून येऊ शकला आणि तोहि ’महात्मा’ ह्या उपाधिसकट हे मला एक गूढ वाटत आहे!  हा नकाशा खाली दर्शवीत आहे.


२७) करी रोड स्टेशन - हे उपनगरी गाडयांच्या स्टेशनचे नाव म्हणून अजून टिकून आहे पण ज्या रस्त्यावरून हे नाव पडले त्या करी रोडला आता महादेव पालव मार्ग असे नाव मिळाले आहे.  सध्याच्या वेस्टर्न रेल्वेचा पूर्वावतार बॉंबे बरोडा ऍंड सेंट्रल इंडिया (बीबीसीआय) रेल्वे हिचे १८६५ पासून १८७५ पर्यंतचे एजंट सी.करी ह्यांचे नाव स्टेशन आणि रस्त्यास दिले होते.  जीआयपी, बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्यांची लंडनमध्ये उभारलेल्या होत्या आणि त्यांची प्रमुख कार्यालये तेथेच होती.  हिंदुस्तानात कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख करणार्‍या प्रमुख अधिकार्‍यास ’एजंट’ अशी उपाधि असे.  ह्या दोन रेल्वे कंपन्यांची बोधचिह्ने मला wiki.fibis.org ह्या संस्थळावर सापडली ती खाली दर्शवीत आहे.


२८) चौपाटी - जुन्या किल्ल्याच्या पश्चिमेस भराव घालून रेक्लमेशनची नवी जमीन तयार करण्यापूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी जवळजवळ सध्याच्या चर्चगेट स्टेशनपर्यंत पोहोचत असे आणि ह्या पाण्याचे चार वेगवेगळे भाग (channels) दिसत.  त्यावरून त्या भागाला चौपाटी हे नाव पडले.  ठाणे जिल्ह्याच्या किनार्‍यावर असेच सातपाटी नावाचे मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे त्याची येथे आठवण होते.

२९) चर्चगेट आणि चर्चगेट स्ट्रीट - मुंबईच्या फोर्ट जॉर्ज किल्ल्याला उत्तरेकडे बझार गेट, दक्षिणेकडे अपोलो गेट आणि पश्चिमेस चर्च गेट असे तीन दरवाजे होते.  पैकी चर्चगेट हे साधारणपणे सध्याच्या हुतात्मा स्मारकापाशी (फ्लोरा फाउंटन) होते आणि जवळच्याच सेंट थॉमस कॅथीड्रलवरून त्याला हे नाव पडले होते.  चर्चगेटमधून येणार्‍याजाणार्‍या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे नाव होते.  गेट १८६० च्या सुमारास आवश्यकता न उरल्यामुळे पाडून टकण्यात आले.  रस्त्याला सध्या वीर नरिमन मार्ग असे नाव आहे.  चर्चगेटचे नाव आता उपनगरी गाडयांच्या स्टेशनच्या रूपाने उरले.  चर्चगेट स्ट्रीट आणि जुने चर्चगेट स्टेशन खाली दाखवत आहे. आहे.






३०) दादर, दादर बीबी आणि टीटी - ’दादर’ ह्या नावाचा उद्भव कसा झाला ह्याबाबत निश्चित अशी माहिती कोणाजवळच उपलब्ध नाही. अशी एक समजूत बरीच रूढ असल्याचे मी ऐकले आहे की दादरमधून जाणार्‍या  रेल्वे रुळांमुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी आणि पादचारी लोकांच्यासाठी तेथे एक पूल आणि जिना - दादर - बांधण्यात आला आणि त्यावरून ह्या उपनगराचे नाव ’दादर’ असे पडले.  ही उपपत्ति स्वीकारार्ह वाटत नाही कारण मुंबईशी संबंधित म्हणून ’दादर’ हा शब्द १८३१ सालात छापलेल्या मोल्सवर्थ मरठी-इंग्लिश शब्दकोषात सापडतो.  तेथे दिलेल्या त्याच्या चार अर्थांपैकी दोन असे आहेत: '3. A bridge.  4. A Bombay word.  A ladder-like and moveable stair-case.'

दादरमधून जुनी बीबीसीआय रेल्वे (पश्चिम रेल्वे) आणि जुनी जीआयपी रेल्वे ह्या दोघींचे मार्ग जातात.  त्यापैकी पश्चिम रेल्वेच्या पलीकडील भागाचे दादर बीबीसीआय ऊर्फ दादर बीबी हे नाव अजून लोकांच्या तोंडात टिकून आहे.  मुंबईमध्ये ट्रॅम होती तेव्हा दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ते म्यूजिअम (परळ-भायखळा-वीटीमार्गे) हा ट्रॅमचा प्रवास दीड आण्यामध्ये होत असे.  ३१ मार्च १९६४ ह्या दिवशी ह्याच मार्गाने मुंबईची शेवटची ट्रॅम धावली.  दादर टीटी म्हणजे सध्याचे खोदादाद सर्कल.

शेपर्ड ह्यांच्या मतानुसार ’मुंबईकडे जाणार्‍या रस्त्याची एक पायरी’ अशा अर्थी हे नाव रूढ झाले असावे.  ठाणे जिल्ह्यातील केळवे गावाच्या बाहेर असलेल्या कोळी वस्तीसहि ’दादर’ असेच कोळी बोलीमधे नाव आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे.

३१) धोबी तलाव - मुंबईची बेटे पोर्तुगीजांकडे असण्याच्या दिवसांत एका धोबी व्यक्तीने तेव्हाच्या ’कवेल’
नावाच्या वस्तीमध्ये आपल्या जमातीच्या लोकांसाठी एक तलाव खोदला होता आणि बांधणार्‍याच्या नवावरून त्याला धोबी तलाव असे नाव पडले होते. धोबी त्या तलावावर आपले कपडे धुण्याचे काम करीत असत.  १८३९ सालापर्यंत तलाव जुना होऊन गाळाने भरला होता आणि त्यावर्षीच्या पाण्याच्या दुष्काळामुळे तो जवळजवळ आटला होता  फ्रामजी कावसजी नावाच्या दानशूर पारसी व्यक्तीने रु ४०,००० खर्च करून तलाव स्वच्छ करून पुन: बांधून घेतला आणि सार्वजनिक उपयोगासाठी तो सरकारच्या हवाली केला. कालान्तराने विहारचे पाणी दक्षिण मुंबईत पोहोचू लागल्यावर अन्य तलावांप्रमाणे ह्याचीहि तितकीशी आवश्यकता उरली नाही आणि नंतर केव्हातरीच्या वर्षात तो बुजविण्यात आला. १८६२ साली ह्या तलावाच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍यावर फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूट उभारण्यात आली.  तिची इमारत ह्या तलावाचा काही भाग वापरून बांधली गेली आहे.  तलावाची आठवण आता पुढील मजकुराचा संगमरवरी लेखातून उरली आहे.  हा लेख फ्रामजी कावसजी इन्स्टिटयूटच्या रस्त्यावरील भिंतीवर पाहायला मिळतो:

Framji Cowasji Tank
That tank was so called by the order of Government to commemorate the late Framji Cowasji's liberality in expending a large sum of money on its reconstruction in the year 1839.


पूर्वीच्या तलावाची जागा आता वासुदेव बळवंत चौकाने व्यापली आहे पण धोबी तलाव हे ह्या भागाचे नावहि वापरात आहे.




मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग १

सॅम्युएल टी. शेपर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने लिहिलेले 'Bombay Place Names and Street Names’ अशा नावाचे आणि आणि १९१७ मध्ये छापलेले एक पुस्तक माझ्यासमोर आले.  मुंबईच्या रस्त्यांची आणि जागांची २०व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात काय नावे होती आणि त्या नावांमागे काय इतिहास दडलेला आहे अशी बरीच मनोरंजक माहिती त्यामध्ये आहे.  बहुतेक माहिती दक्षिण मुंबई आणि जवळचे भायखळ्यासारखे भाग येथील रस्त्यांबाबत आहे कारण पुस्तकाच्या इंग्रज लेखकाचे राहणे-फिरणे ह्याच भागात होत असणार.  ह्या माहितीपैकी बारीकसारीक गल्ल्याबोळ सोडून सर्वसामान्यत: कोणाहि वाचकास परिचित वाटतील अशा माहितीचे संकलन करून एक लेखमालिका लिहिण्याचा विचार आहे आणि त्यातील पुढील लेख पहिला असून इंग्रजी आद्याक्षरे अ आणि ब इतकी त्याची व्याप्ति आहे.  लेखाची तयारी करतांना संदर्भासंदर्भाने अन्य पुस्तके, विशेषत: डॉ.जे.गर्सन दा कुन्हा ह्यांचे Origin of Bombay, एस.एम.एडवर्ड ह्यांचे The Rise of Bombay ही दोन पुस्तक आणि जालावरील समोर आलेली माहिती ह्यांचाहि उपयोग येथे करण्यात आला आहे.

शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे.  ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते.  पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते.  बर्‍याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते.  ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते.  ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे  ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच.  रुस्तुमजी पेस्तनजी करकारिया हे असेच एक पारशी माहितगार गृहस्थ.  ह्यांचीहि विशेष माहिती मिळत नाही पण ह्यांनी लिहिल्या बर्‍याच पुस्तकांचे त्रोटक उल्लेख गूगलशोधात दिसतात.  स्वत: शेपर्ड ह्यांनी लिहिलेल्या 'The Byculla Club 1833-1916' आणि 'Bombay' अशा नावांच्या अन्य दोन पुस्तकांचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसला.

पुस्तकातील माहिती येथे संकलित करतांना मी दोन चाळण्या लावलेल्या आहेत.  ब्रिटिश सत्तेखालील मुंबईतील हॉर्नबी, मेडोज, फ्रेअर अशी रस्त्यांची नावे स्वातन्त्र्योत्तर काळात बहुतेक बदलली गेली आहेत आणि त्या जुन्या नावांचा उल्लेख आताच्या वाचकाला बुचकळ्यात टाकतो.  रस्त्यांना नावे देणारे हे पूर्वकालीन प्रतिष्ठित कोण होते ह्याची माहितीहि शोधू पाहणार्‍यास सहज जालावर सापडते.  ह्या कारणांसाठी अशा रस्यांची नावे येथे वगळली आहेत.  जुन्या किल्ल्याच्या उत्तर भागातील भुलेश्वर-भायखळा-परळ अशा भागातील लहानसहान रस्ते त्या परिसराशी परिचय असणार्‍यांनाच माहीत असतात, इतरांना त्या त्या नावांवरून काहीच बोध होत नाही.  अशी नावेहि येथे वगळण्यात आली आहेत.  आजहि वापरात असलेल्या आणि मुंबईची सर्वसामान्य ओळख असणार्‍या व्यक्तीस माहीत असू शकतील अशाच स्थानांच्या वा रस्त्यांच्या नावांना ह्या संकलनात जागा दिली आहे.  मुंबईचे माहितगार वाचक ह्यामध्ये अजून भर घालू शकतील.

१) अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड आणि ऍन्स्टी रोड- खंबाला हिलवरील उच्चभ्रू वस्तीच्या अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे.  हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता.  जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७ वर हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.

मुंबईतील जुने प्रख्यात वकील टी.ई.ऍन्स्टी (१८१६-७३) ह्यांचे नाव ऍन्स्टी रोड ह्या रस्त्यास मिळाले आहे.

२) अलेक्झॅंड्रा, लॅबर्नम आणि सिरस (Cirrus) मार्ग - ह्या तिनांपैकी लॅबर्नम रोड प्रसिद्ध आहे आणि शेजारच्या चित्रात दिसत आहे. त्याच्याच जोडीला अलेक्झॅंड्रा आणि सिरस अशा नावाचे त्याला समान्तर असे दोन रस्ते होते.  हे तिन्ही रस्ते बॉंबे इंप्रूवमेंट ट्रस्टने ह्या भागाची नव्याने आखणी करतांना निर्माण केले आणि त्यांना तीन फुलझाडांची नावे दिली.  पैकी अलेक्झॅंड्रा आणि सिरस ही नावे कोठल्या फुलझाडांसाठी आहेत हे लवकरच विसरले गेले कारण ही फुलझाडे इतकी प्रसिद्धहि नव्हती.  स्वातन्त्र्यानंतरच्या नावे बदलण्याच्या लाटेत ह्या दोन रस्त्यांना वाच्छागांधी आणि काशीबाई नवरंगे ह्यांची नावे मिळाली.  (काशीबाई पं. रमाबाईंसारख्याच ख्रिश्चन शैक्षणिक चळवळीत होत्या आणि तो भाग ह्या कार्यासाठी आजहि प्रसिद्ध आहे.)  तिसर्‍याचेहि नाव बदलले जायचे पण लॅबर्नम म्हणजे अमलतास अथवा बहावा.  हे नाव कोठल्या साहेबाचे नाव नसून एका फुलाचे आहे हे वेळीच लक्षात आल्यामुळे तेवढे मात्र वाचले!



३) अपोलो गेट/बंदर - मुंबईच्या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या गेट आणि बंदराला हे नाव का पडले असावे ह्याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.  Bombay City Gazetteer Vol I मधल्या अंदाजानुसार जुन्या काळात ’पाल-पालव’ नावाच्या देशी नौका तेथे नांगरलेल्या असत त्यावरून हे नाव पडले असावे. गर्सन दा कुन्हा ह्यांनाहि हाच अर्थ जाणवतो.

४) ऍंटॉप हिल - ह्या नावाच्या उगमाबद्दल मतमतान्तरे आहेत.  रा.ब. जोशींच्या मते ’अंतोबा’ हे नाव मुंबईच्या जुन्या रहिवाशांमध्ये लोकप्रिय होते आणि ह्या टेकडीचा भाग कोणा अंतोबाच्या मालकीचा असावा.  नंतर पोर्तुगीज काळात हे सूत्र विस्मरणात जाऊन नावाचा कालान्तराने ’ऍंटॉप हिल’ असा अपभ्रंश झाला.

५) ऍश लेन, ओक लेन आणि टॅमरिंड लेन - तीन झाडांची नावे ह्या तीन छोटया रस्त्यांना मिळाली आहेत.  त्यांपैकी ओक लेन नक्की कोठे होती हे आता गूगलला समजत नाही, जरी त्या भागाच्या पोस्टमनांना ते माहीत असावे कारण अनेक जागांच्या पत्त्यांमध्ये अजूनहि तिचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसतो.  बाकीचे दोन रस्ते शेजारच्या चित्रात दिसत आहेत.


त्यांपैकी ऍश लेन ह्या नावाचे कोडेच आहे कारण त्या भागात कधीकाळी एखादे ऍशचे झाड असल्याचा उल्लेख नाही.  तसेच ऍश हे झाड मुंबईच्या दमट हवेत वाढू शकेल काय ह्याचीहि खात्री नाही.  टॅमरिंड लेन ह्या नावाला मात्र निश्चित कूळकथा आहे.लेनच्या थोडया उत्तरेला असलेल्या सेंट थॉमस कॅथीड्रल आणि बॉंबे ग्रीन ह्यांच्या मध्यावर एक चिंचेचे झाड होते.  तेथे आधी चिंचेची बरीच झाडे होती पण अखेर एकच उरले होते आणि त्याच्या सावलीत सार्वजनिक लिलाव चालत असत.  भाडयाने गाडया चालवणार्‍यांच्या शब्दात त्या जागेला ’आमली आगळ - चिंचेसमोरची जागा’ असे नाव होते. (’आमली आगळ’चा ह्याच अर्थाने उल्लेख गर्सन दा कुन्हा ह्यांच्या Origin of Bombay ह्या पुस्तकाच्या पान ५९ वरहि मिळतो.)  हे शेवटचे झाड नोवेंबर १८४६ मध्ये तोडले गेले.  त्याची आठवण आता केवळ रस्त्याच्या नावात उरली आहे.

६) बॅरक रोड/स्ट्रीट २९ आणि मरीन लाइन्स ९८.  शेपर्ड ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरक स्ट्रीट नावाचा रस्ता बझार गेट स्ट्रीटपासून मिंट रोडच्या मध्ये होता.  ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वत:चे नेटिवांतून भरती केलेले सैनिक होतेच पण ब्रिटनमधील राजाचे गोरे सैनिकहि त्यांचा खर्च देऊन कंपनी आपल्याकडे ठेवत असे.  अशा सैनिकांच्या राहण्याच्या जागेला ’King's Barracks' असे म्हणत असत आणि ही जागा किल्ल्याच्या भिंतीभाहेर एस्प्लनेड मैदानाच्या उत्तर अंगाला होती.  त्यांचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे.  सध्याच्या गूगलमधील नकाशात एक बॅरक रोड दिसत आहे पण तो बझार गेट स्ट्रीटच्या जवळपास कोठेच नाही.  अशी शक्यता वाटते की कंपनीच्या स्वत:च्या चाकरीत असलेल्या नेटिव सैनिकांच्या बॅरक्स येथे असू शकतील.

१८३० सालापर्यंत कंपनीची ’बॉंबे मरीन्स’ नावाची लढाऊ नौसेना होती आणि नंतर तिचेच वेळोवेळी इंडियन नेवी, रॉयल इंडियन नेवी असे नाव बदलत गेले.  ह्या नौसैनिकांच्या बॅरक्सवरून त्या भागाला मरीन लाइन्स हे नाव पडले आहे.


७) बॅंक स्ट्रीट - हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) येथून दक्षिणेकडे निघणारा रस्ता.  १८६५ च्या कापूस घोटाळ्यात जुनी बॅंक ऑफ बॉंबे बुडाली.  पुनर्रचित बॅंक ऑफ बॉंबे आपल्या नव्या इमारतीत १८६६ साली गेली.  ती इमारत ह्या रस्त्यावर होती आणि रस्त्याला ’बॅंक स्ट्रीट’ हे नाव मिळाले.  १९२१ साली नव्या इंपीरियल बॅंकेत ही बॅंक १९२१ मध्ये विलीन झाली.  इंपीरियल बॅंकेचा पुढचा अवतार म्हणजे सध्याची स्टेट बॅंक ऑफ इंडिया होय.



८) बाबुला टॅंक, बाबुला टॅंक रोड आणि डोंगरी जेल - बाबुला टॅंक नावाची जागा अजूनहि खाली दाखविलेल्या गूगल मॅपच्या तुकडयामध्ये भुलेश्वर-उमरखाडी भागात दिसत आहे पण तेथे सध्या कोठलाच तलाव नाही. शेजारच्या १८८२ सालच्या सर्वे नकाशात मात्र तलाव दिसत आहे आणि तलावाजवळ एक जेल आणि जेल रोडहि दिसत आहे.  त्यापैकी जेल आता तेथे नाही कारण त्याच्या जागी ’आशा सदन’ ही स्त्रियांसाठीचे आसराघर दिसत आहे.  कोल्हापूरचे कारभारी माधवराव बर्वे ह्यांनी गुदरलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निकाल विरुद्ध जाऊन मराठा आणि केसरीचे मुखत्यार अनुक्रमे आगरकर आणि टिळक ह्यांना १८८२ साली जेथे १०१ दिवस तुरुंगवासात काढावे लागले तेच हे डोंगरी जेल.  टिळकांची १९०८ साली मंडालेला पाठवणी झाली तेव्हाहि तेव्हाहि त्यांना पुण्याहून आणून येथेच ठेवले होते.  हा भाग थोडा उंचवटयाचा असल्याकारणाने त्यास डोंगरी म्हणत असत.

बाबुला टॅंक हा तलाव कोणा उदार व्यक्तीने १८४९ साली मुंबईकर रहिवाशांना पाणी पु्रवण्यासाठी  खोदला आणि १९०७ पर्यंत तो तेथे होता.  १९०७ साली तो बुजवण्यात आला आणि आता त्याचे नावच काय ते उरले आहे.  त्या भागात एकेकाळी असलेल्या बाभळीच्या झाडांवरून त्या तलावास हे नाव पडले असे दिसते.  १८८२ च्या नकाशात बाबुला टॅंक रोडहि दिसत आहे त्याचे आता रामचंद्र भट मार्ग असे नामकरण झाले आहे असे दिसते.




९) बाबुलनाथ मंदिर आणि बाबुलनाथ मार्ग - बाबुलनाथ मंदिराला ते नाव का पडले ह्याबद्दल आर.पी. करकारिया ह्यांचे मत असे की बाबुल नावाच्या एका सुताराने येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून देवळाचे नाव बाबुलनाथ असे पडले.  मंदिराच्या पुजार्‍यांचा ह्याला पाठिंबा आहे.  उलटपक्षी रा.ब. जोशी म्हणतात की बाबलजी हिरानाथ नामक सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील गृहस्थाने हे देऊळ निर्माण केले आणि त्याच्या नावावरून देवळास बाबुलनाथ म्हणतात.  मूळचे देऊळ १७८० चे असून सध्याचे देऊळ तेथेचे १९०० साली बांधण्यात आले आहे.  देवळावरून जाणारा बाबुलनाथ रस्ता इंप्रूवमेंट ट्रस्टने १९०१ साली बांधून कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिला.

१०) बापू खोटे स्ट्रीट आणि किका स्ट्रीट - बापू खोटे हे नाव हिंदु माणसाचे वाटते पण ह्या रस्त्याचे बापू खोटे हे त्या भागातील बर्‍याच मालमत्तांचे मालक असलेल्या एका कोंकणी मुसलमान व्यक्तीवरून पडले आहे.  ते प्रसिद्ध हकीमहि होते अशी समजूत आहे.  जगजीवन किका ह्यांच्याबद्दल नावापलीकडे काही अन्य माहिती उपलब्ध नाही.



११) बलराम रोड आणि बॅप्टी रोड -  बलराम रोडचे नाव रा.ब. येल्लप्पा बलराम (१८५०-१९१४) ह्या तेलुगु व्यक्तीवरून वरून पडले आहे.  त्यांचे राहते घर ह्या रस्त्यावर होते.  मुंबई-पुणे-कराची येथील इंग्रज सैन्याला घाऊक प्रमाणावर दूध पुरवण्याच्या व्यवसायातून ह्यांचे आजोबा आणि वडील मुंबई-पुण्याकडे आले.  येल्लप्पा ह्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून बांधकाम कंत्राटे घेण्यास सुरुवात केली.  १८५६-६० ह्या काळात विहार तलाव बांधल्यानंतर मुंबईला पाणी पुरविण्यासाठी शहरातील उंच ठिकाणांवर साठवणीचे तलाव बांधून तेथपर्यंत विहारचे पाणी पंपाने पोहोचविण्याची सोय करण्यात आली.  त्यांपैकी एक तलाव माझगाव भागातील भंडारवाडा टेकडीवर निर्माण करण्यात आला.  त्याचे बांधकाम  हे येल्लप्पा बलराम ह्यांचे विशेष काम मानले जाते.  (ह्या तलावाच्या जागी आता जोसेफ बॅप्टिस्टा उद्यान उभे आहे.)

बॅप्टी रोडचे नाव जेम्स बॅप्टी ह्यांच्यावरून पडले आहे.  ह्या भागात त्यांची पिठाची गिरणी आणि केकसाठी प्रसिद्ध असलेली बेकरी होती.

१२) बनाम हॉल लेन - रा.ब.जोशींचे राहते घर ह्या गल्लीतच होते.  तिच्या नावाबाबत त्यांनी पुरविलेली मनोरंजक माहिती अशी.  ह्या जागी प्रथम असलेल्या नारळांच्या वाडीमध्ये एक घर होते आणि त्याला ’वन महाल’ अथवा ’बन महाल’ असे ओळखत असत आणि त्या घरावरून गल्लीला बन महाल लेन असे ओळखत असत.  मुंबईचे कमिशनर ऍकवर्थ (१८९०-९५) हे रजेवर इंग्लंडला गेले होते आणि ते माल्वर्न गावात आपल्या ’बेनहम हॉल’ नावाच्या घरात राहात होते.  तेव्हा त्यांच्याकडे मुंबईहून काही पत्रे आली ज्यावर ह्यावर ह्या गल्लीचा पत्ता होता.  गल्लीच्या आणि त्यांच्या घराच्या नावातील साम्यामुळे त्यांना असे वाटले की ह्या गल्लीचे नाव बेनहम हॉलवरून ठेवावे.  त्यांची सूचना अर्थातच (!) मंजूर होऊन गल्ली ’बेनहम हॉल लेन’ झाली आणि त्याच नावाचे रूपान्तर देशी लोकांच्या बोलण्यात ’बनाम हॉल लेन’ असे झाले.

गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्‍याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे.  गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.

१३) बझार गेट स्ट्रीट, गनबो स्ट्रीट, अग्यारी लेन, बोरा बझार स्ट्रीट - १८६२ साली किल्ल्याची भिंत पाडण्याच्या
वेळी जमीनदोस्त झालेल्या दरवाज्याच्या नावावरून बझार गेट स्ट्रीट हे नाव पडले आहे.  किल्ल्याच्या उत्तर सीमेपलीकडे नेटिवांची वस्ती, म्हणजेच ’बझार’ (Black Town) आणि  भिंतीमध्ये बझार गेट नावाचे दार - खरे तर तीन दारे, एक मोठे व दोन लहान, नेटिव त्याला ’तीन दरवाजा’ म्हणत असत - होते.

गनबो स्ट्रीटबाबत दोन गोष्टी उपलब्ध आहेत.  एकीनुसार जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे एक पूर्वज गणबा ह्यांच्या मालकीची जमीन ह्या भागात होती आणि त्याचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे.  दुसरीनुसार गनबावा नावाच्या मुस्लिम फकिराच्या नावाची विहीर ह्या परिसरात होती. गनबावाच्या नावावरून रस्त्याला हे नाव मिळाले आहे.  गनबावाची विहीर नंतर केव्हातरी बुजविण्यात आली पण आपण ती पाहिली असल्याचे दिनशा वाच्छा ह्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणींमध्ये नोंदवले आहे.

अग्यारी लेन हे नाव माणकजी नौरोजी सेठ ह्यांनी १७३३ साली तेथे बांधलेल्या अग्यारीवरून आलेले आहे.  मुंबईच्या पूर्व किनार्‍याकडील ’नौरोजी हिल’ ह्या नावाने ओळखली जाणारी आणि ’डोंगरी’ अशा मूळच्या नावाची उंचवटयाची जागा ह्यांच्याच मालकीची होती. अग्यारीची पुनर्बांधणी १८९१ मध्ये करण्यात आली.

बोरा बझार स्ट्रीट हे नाव मुळात बोहरा बझार स्ट्रीट असे आहे आणि त्या भागात मोठया प्रमाणात राहणार्‍या बोहरा जमातीवरून ते नाव पडलेले आहे.

१४) बोरी बंदर - जी.आय.पी रेल्वे रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ह्या भागातील समुद्रातील खडक आणि वाळूचे उथळ भाग काढून टाकून रेल्वेच्या कामासाठी इंग्लंडहून येणारे जड लोखंडी सामान उतरवून घेण्यासाठी एक बंदर १८५२ साली तयार करण्यात आले आणि ह्या जागी मूळच्या असलेल्या रानवट बोरीच्या जंगलावरून त्याला बोरीबंदर असे नाव पडले.  नंतर ह्याच जागी रेल्वे गाडया सुटण्याचे जे स्टेशन तयार झाला त्यालाहि तेच नाव चालू राहिले.  नंतर येथेच एक नवी भव्य इमारत उभारून १८८७ साली ती वापरात आणण्यात आली आणि विक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या ५०व्या वर्षाच्या प्रसंगाने तिला विक्टोरिया टर्मिनस - VT - हे प्रसिद्ध नाव मिळाले.  तत्पूर्वी वापरात असलेल्या मूळच्या बोरीबंदर स्टेशनाचे चित्र येथे दर्शवीत आहे.

१५) बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते.  मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते.   (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai) .  ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात.  पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे.  दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’.  १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे.  Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे  Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही.  ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.

१६) ब्रीच कॅंडी, हॉर्नबी वेलार्ड आणि लव ग्रोव - १७७१ ते १७८४ ह्या काळात मुंबईचे गवर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी ह्यांनी लव ग्रोव ते महालक्ष्मी ह्या भागातून आत घुसणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी बांधलेल्या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव होते.  बांध अशा अर्थाच्या vallado ह्या पोर्तुगीज शब्दाचे हे इंग्रजी रूप आहे.  सध्या ह्याचे नाव लाला लजपतराय मार्ग असे आहे.  हा बांध घालण्याच्या पूर्वी भरतीचे पाणी आत शिरून पूर्वेकडील उमरखाडीपर्यंत खारी दलदल निर्माण करीत असे.  तिच्या जागी पक्की जमीन करण्याच्या विचाराने हॉर्नबी ह्यांना हा बांध घालावयाचा होता पण लंडनमधील कंपनीचे डिरेक्टर बोर्ड त्या खर्चाला तयार नव्हते.  आपल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसात हॉर्नबी ह्यांनी हे काम सुरू केले आणि बोर्डाकडून त्याला मिळालेली नामंजुरी मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ते पूर्णहि केले.

ह्याच्या उत्तरेला असलेला लव ग्रोव भाग तेव्हा मुंबईपासून दूर आणि एकान्ताचा असल्याने प्रेमी जोडप्यांना तेथे जाऊन निवान्तपणे प्रेमालाप करता येत असत ह्यावरून त्या भागास लव ग्रोव हे नाव पडले.  नंतर सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तीच जागा योग्य म्हणून निवडली गेल्याने तिच्या जुन्या रोमॅंटिक संदर्भाला काही अर्थ उरलेला नाही.

ब्रीच कॅंडी ह्या नावाच्या उगमाविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही पण महालक्ष्मीच्या देवळाबाहेरील समुद्र खडकाळ असल्याने त्या भागात समुद्रकिनारा तुटल्यासारखा होता म्हणून त्यास ’ब्रीच’ म्हणू लागले अशी उपपत्ति बहुतेक ठिकाणी दिलेली आढळते.  ’कॅंडी’चा संबंध ’खिंड’ ह्या मराठी शब्दाशी जोडला जातो.

१७) भायखळा - ह्या नावाचे दोन अर्थ सुचविण्यात आले आहेत.  अन्य लेखकांच्या आधारे गर्सन दा कुन्हा ह्या नावाचा उगम  बहावा - बावा (कुणबी भाषेत) - भाया (कोळी अपभ्रंश) आणि खळे (जागा) असा दाखवतात.  बहावा म्हणजे अमलतास, Cassia fistula.  येथे असलेल्या बहाव्याच्या झाडांवरून भायखळे हे नाव पडले असावे.  रा.ब.जोशी हा अर्थ अमान्य करीत नाहीत पण ’भाया नावाच्या व्यक्तीच्या मालकीची जागा’ असा अन्य अर्थ सुचवितात.

Monday, October 28, 2013